भोकर (प्रतिनिधी)- एका महिलेशी बोलल्याच्या कारणावरून झालेली मारहाण 44 वर्षीय व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना भोकर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी भोकर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
शेख चांद पाशा शेख रशीद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 ते 8.00 वाजण्याच्या सुमारास भोकर तालुक्यातील दरमिळ गावात त्यांचे भाऊ शेख नाईम शेख रशीद (वय 44) यांना साधू रामचंद्र चव्हाण (वय 40) याने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. आरोपीने लाकडी काठीने डोक्यावर व पाठीवर वार केले तसेच लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने शेख नाईम गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू असताना 13 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तक्रारीवरून भोकर पोलिसांनी आरोपी साधू रामचंद्र चव्हाण याच्याविरुद्ध खून केल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक 5/92/2025 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंभार हे करीत आहेत.
