हिमायतनगर येथील दिलीप आलाराठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजता वसंत लाज येथे रविराज उर्फ बंडू जळबाराव दूधकवडे (रा. कांडली), रावसाहेब आनंदराव कदम (रा. वडगाव), योगेश रावसाहेब लवाळे (रा. पारवा), गणेश पाडलू मुनेश्वर, वैशाली संजय मुनेश्वर, सुनिता रावसाहेब लवाळे व राजेश्वर हत्तीअंभिरे पालमकर यांनी “तुझे स्वागत पहिले कसे करतात?” असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील ६ हजार रुपये व हातातील सोन्याची अंगठी बळजबरीने चोरून नेली. याप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा (गु. र. नं. ४३४/२०२५) दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक नंद अधिक तपास करीत आहेत.
कंधार शहरातही दुकानफोडीची घटना घडली आहे. कंधार येथील शेख इम्रान अब्दुल खादर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेपासून १२ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान कंधार शहरातील पाकीजा किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. दुकानाचे तीन पत्रे कापून आत प्रवेश करून सिगारेट, तंबाखू, काजू, बदाम असा एकूण ६७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा (गु. र. नं. ४११/२०२५) दाखल करण्यात आला असून पोलीस अंमलदार डिकळे अधिक तपास करीत आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. मंथन बोरा यांच्या घरी चोरी झाली होती. प्रारंभी त्यांनी १२ तोळे सोने, ४ किलो चांदी व ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे मंथन बोरा यांनी वास्तव न्यूज लाईव्हला सांगितले होते. मात्र पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार त्यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने व २० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (गु. र. नं. ४४४/२०२५) दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक हुसेन अधिक तपास करीत आहेत.
