स्वारातीम विद्यापीठात ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रम उत्साहात; अविष्कार २०२६ संशोधन संमेलनातून तरुण मनांना संशोधनाची प्रेरणा

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये ९ डिसेंबर, २०२५ रोजी ‘स्कूल कनेक्ट’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात
पार पडला. जिल्हा परिषद शाळा, विष्णुपुरी तसेच परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी या कार्यक्रमात सहभागी होत विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधनात्मक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. हा कार्यक्रम ‘अविष्कार २०२६’ महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ संशोधन संमेलनाचा एक महत्त्वपूर्ण घटक ठरला. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण आणि
संशोधनाबद्दल प्रेरणा निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमाला जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आय.ए.एस. मेघना कावली यांनी पाठिंबा दर्शवून या प्रभावी उपक्रमाबद्दल विद्यापीठाचे कौतुक केले. “शालेय आणि उच्च शिक्षणातील अंतर कमी करणे व तरुण पिढीत नावीन्याची
ज्योत पेटविण्यासाठी अशा उपक्रमांची मोठी गरज आहे,” असे त्या म्हणाल्या.
विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील संशोधन सहभागींनी सादर केलेल्या पोस्टर्स, मॉडेल्स, नवोन्मेषी प्रात्यक्षिके यांचे
निरीक्षण केले. विविध विभागांच्या मार्गदर्शित भेटीत त्यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.


विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी सांगितले, “आजचे विद्यार्थी हे उद्याचे नाविन्यकर्ते आहेत. ‘स्कूल कनेक्ट’मुळे आम्ही त्यांच्या तरुण मनात जिज्ञासा आणि संशोधनाची ओढ निर्माण करीत आहोत. त्यांना संशोधन आणि उच्च शिक्षणातील भविष्याची कल्पना करण्यास प्रोत्साहन देत आहोत.”
शालेय स्तरापासून संशोधन केंद्रित विचारसरणी विकसित करण्याच्या विद्यापीठाच्या वचनबद्धतेवर त्यांनी पुन्हा एकदा भर दिला. ‘स्कूल कनेक्ट’ सारखे उपक्रम भविष्यातील विचारवंत आणि नेते घडवण्यासाठीच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहेत, जे राज्याच्या सकल नोंदणी प्रमाण (जीईआर) वाढविण्याच्या ध्येयाशी हा उपक्रम सुसंगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, अधिष्ठाता डॉ.
एम. के. पाटील, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. एस. जे. वाढेर, आयक्यूएसी सेलचे संचालक डॉ.
बी. सुरेंद्रनाथ रेड्डी आणि अविष्कार २०२६च्या समन्वयक डॉ. रुपाली एस. जैन यांच्या समर्पित प्रयत्नामुळे शक्य झाला, ज्यांच्या सामुहिक वचनबद्धतेमुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
‘स्कूल कनेक्ट’ उपक्रमातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक आकांक्षा आणि प्रत्यक्ष संशोधन अनुभव यांच्यातील दुवा अधिक मजबूत केला असून पुढील पिढीतील संशोधक व नाविन्यकर्त्यांना प्रेरित करण्याच्या दिशेने तो एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!