कलावंतांचा सन्मान करण्यात येणार; यात्रेत स्वच्छतेवर भर

नांदेड – दक्षिण भारतातील ग्रामीण भागात भरणाऱ्या मोठ्या यात्रांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेचे वैभव अधिक वाढविण्यासाठी यावर्षी कुस्ती, कृषी व पशु स्पर्धांच्या बक्षीस रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.

माळेगाव येथे आज आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय अधिकारी नरवटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, यात्रा सचिव डी.बी. गिरी, अभियंता राहुल रावसाहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडीले, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, गटविकास अधिकारी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यंदा कुस्ती, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या स्पर्धांसाठी जवळपास ५० लाख रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या फळपिके व मसाला पिक स्पर्धेत गटात प्रथम बक्षीस ७ हजार, द्वितीय ६ हजार, तृतीय ५ हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागात लाल कंधारी ब्रिड चॅम्पियन नर व मादी गटासाठी प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये, देवणी नर व मादी गटासाठी प्रत्येकी ७१ हजार रुपये तसेच लाल कंधारी स्पर्धेत नर व मादी गटासाठी प्रत्येकी ५१ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. या विभागासाठी एकूण ११ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.

माळेगाव यात्रा कुस्तीसाठी प्रसिद्ध असून, यंदा कुस्ती स्पर्धेच्या बक्षिसात प्रत्येकी १० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी ६१ हजार, द्वितीय ५१ हजार, तर तृतीय ४१ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. लोकनाट्य मंडळांना प्रत्येकी ७१ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. शंकरपट स्पर्धेत प्रथम ६१ हजार, द्वितीय ५१ हजार, तृतीय ४१ हजार रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

यात्रेदरम्यान येणाऱ्या विविध कलावंतांचा सन्मान करण्यात येणार असून, यात्रा प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन व ग्रामपंचायतींनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

माळेगाव यात्रेसाठी दरवर्षी जिल्हा परिषदेला २ कोटी रुपयांचा निधी मिळावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व इतर मंत्र्यांना यात्रेचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आमदार चिखलीकर यांनी दिली.

यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, वीजपुरवठा व पाणीपुरवठा सुरू असून आमदार निधीतून दोन डीपी, २५ पोल व हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. तलाव फुटल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात्रेदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त, आरोग्य सुविधा व स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना माळेगाव यात्रेचे महत्त्व समजावे यासाठी जिल्हाभरातील शाळांच्या सहली आयोजित करण्याच्या सूचनाही आमदारांनी दिल्या.

चौकट
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी यात्रेच्या नियोजनाची माहिती देताना सांगितले की, यंदा सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्यात आले असून तलाव परिसरात सहा जीव रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पाणीपुरवठा, आरोग्य सेवा तसेच सहा फिरती व दहा दुरुस्त केलेली सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात्रेचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा यात्रा सचिव डी.बी. गिरी यांनी केले. या बैठकीला विविध खात्यांचे विभाग प्रमुख, मंदिर समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी आदींची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!