मुदखेड/उस्मानगर (प्रतिनिधी)- उस्माननगर पोलीस ठाणे हद्दीतील येळी तसेच मुदखेड पोलीस ठाणे हद्दीतील महाटी परिसरात गोदावरी व सीता नदीच्या पात्रात सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन महसूल विभाग, उस्माननगर पोलिस व मुदखेड पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या ठिकाणांहून तब्बल ₹2 कोटी 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार परळीकर व त्यांच्या सहकारी आणि उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी, पोलीस अंमलदार गंगाधर चिंचोरे, तुकाराम जुने, प्रदीप राठोड तसेच मुदखेडचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, पोलीस अंमलदार दिलीप चक्रधर, रणजीत वानोळे, अनिल पगलवाड आदींचा पथकात समावेश होता.
पथकाने येळी गावाजवळ गोदावरी नदी काठावर छापा टाकताच अवैध वाळू उपसा करणारे सर्व जण पोलिसांना पाहून पसार झाले. पुढील कारवाईदरम्यान पथक महाटी परिसरात पोहोचले असता गोदावरी आणि सीता नदी मिळणाऱ्या भागात मोठमोठ्या बोटी व इंजिनांच्या साहाय्याने अवैध उत्खनन सुरू असल्याचे आढळले. येथेही पोलिसांची चाहूल लागताच सर्वजण पळून गेले.

याठिकाणाहून पोलिसांनी
- सात मोठ्या लोखंडी फायबर बोटी (किंमत अंदाजे ₹1 कोटी 75 लाख)
- तीन छोटे लोखंडी इंजिन
- वाळू उपसा करणारे उपकरणे (किंमत अंदाजे ₹45 लाख)
असा मिळून एकूण ₹2 कोटी 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या अवैध उत्खननामागील मालक व सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
