नांदेड (प्रतिनिधी)- शहरात चोरट्यांनी गाडीला मुद्दाम पंचर करून तब्बल 30 लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लंपास केल्याची धाडसी घटना काल (मंगळवार) रात्री सुमारे 10 वाजता घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या वचकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जुना मोंढा परिसरातील तेल व्यापारी रतन पारसेवार हे रात्री आपले दुकान बंद करून एमएच 26 सीपी 8666 या चारचाकीमधून घरी निघाले होते. जुना मोंढा वर्तुळ पार करून वजीराबादकडे जात असताना वर्तुळापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर गाडी पंचर झाल्याचे त्यांना लक्षात आले. ते वाहनातून खाली उतरून गाडीच्या दुसऱ्या बाजूस तपासणीसाठी गेले.
याच दरम्यान चोरट्यांनी पूर्वनियोजित पद्धतीने त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडून रोख रक्कम असलेली अंदाजे 30 लाखांची बॅग पळवली. संपूर्ण प्रकार अतिशय थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध रीतीने केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
घटनेनंतर अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील अनेक दुकानांमध्ये तसेच ज्या ठिकाणी गाडी उभी होती त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्यामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. गाडीला पंचर पूर्वीच करून ठेवण्यात आले होते का? याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मोठे व्यवसायिक असल्याने पारसेवार यांच्या गाडीत मोठी रक्कम असल्याबद्दल शंका घेण्याचे कारण नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मात्र शहरातील वाढत्या चोरीच्या घटना आणि पोलिसांचा कमी होत चाललेला वचक यावर मात्र नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत.
