सिंहावलोकन…नववर्ष संकल्पनांचे

वर्ष नवे, हर्ष नवे म्हणत प्रारंभी अर्थात नववर्ष दिनी आखलेल्या योजना आणि केलेले संकल्प किती प्रत्यक्षात आले याचे सिंहावलोकन करण्याचा काळ म्हणजे सरता डिसेंबर महिना… डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा देखील आता संपला आहे. त्यामुळे हे काम करायलाच हवे आणि सिंहावलोकन करताना स्वत:ला आरसा दाखवावा… जवळपास केलेले संकल्प हे केवळ नव्याचे 9 दिवस म्हणत वर्षाच्या दुसऱ्या महिन्यापर्यंत टिकले नाही हे जाणवेल. ज्यांनी नेटाने संकल्प केले त्यांचे यानिमित्त विशेष अभिनंदन देखील करावेच लागेल.

            बोलायला पैसे थोडेच लागतात म्हणत मोठ्या प्रमाणात संकल्प केले जातात ही आपली मानसिकता आहे. मात्र अंथरुण पाहून पाय पसरावेत या उक्तीप्रमाणे हे संकल्प होत नाही, म्हणून हे संकल्प टिकत नाहीत. आपल्या आरोग्यासाठी किमान रोज 10 हजार पावलं चालायची हा संकल्प आणि याला कारण अर्थातच प्रत्येकाच्या हातात आलेले ‘स्मार्ट वॉच’ आणि मोबाईल होय. यात आपण चाललेली पावलं मोजली जातात आणि त्याचा महिनावार आलेख ही जपला जातो. प्रत्यक्षात उद्दीष्ट किमान 2 हजार पावलं असे सुरू करून पुढील प्रत्येक महिन्यात 1 हजार पावलं वाढवली तर हे उद्दीष्ट आवाक्यात येऊ शकते.

            कोरोना नंतर आलेल्या ‘न्यू नॉर्मल’ ने आरोग्याचे खूप महत्व आहे याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला झाली. यामुळे मोठ्या प्रमाणावर जागरूकता आली असली तरी मनुष्य स्वभावाचा स्थायी भाव बदलत नाही. परिणामी “जूने जाऊ द्या मरणालागुनी”  या उक्तीचा प्रत्यय येवून सर्वांचे न्यू  नॉर्मल आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न या उक्तीवर येत आपण जुन्या सवयींकडे वळलो हे जाणवेल.

            आजच्या धकाधकीच्या युगात आयुष्याची वृद्धी होण्यासाठी आरोग्य संपन्न राहण्याची गरज आहे. ताण-तणावापासून दूर राहण्याची गरज आहे, असे असताना आपण स्पर्धेत धावतोय यामुळे Life Work Balance  ढासळलाय याचा थेट परिणाम आपल्या जीवनशैलीवर आणि पर्यायाने आरोग्यावर झालेला आहे.

            मोबाईलवर आरोग्यदायी पावलं मोजण्याचा संकल्प प्रत्यक्षात डोळ्यांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या ‘रिल्स’ बघण्यात कधी बदलला हे कळलच नाही, ही वस्तुस्थिती आहे. ‘रिल्स’ हा प्रकार तसा मनोरंजक असला तरी बघण्याचे भान आपले आहे. आपण किती काळ त्यासाठी देणार हे आपणच ठरवायच बघणारे मात्र भान हरपून बघत बसतात.

            रिल्स बनविण्याचे आणि त्यातून पैसा कमावण्याचे वेड अतिशय भयानक…त्यापायी जीव धोक्यात घालणारे आणि जिवाला मुकलेले यांची संख्या दिवसागणीक वाढत आहे.

            कामाचा ताण कमी व्हावा यासाठी रिल्स बघणे हा उपाय नाही. कामाचा ताण कमी करण्यासाठी कामाचे व्यवस्थापन आणि वेळेचे नियोजन या दोन महत्वाच्या बाबी आहेत. काम करताना त्यांचा प्राधान्यक्रम ठरविणे ही सर्वात महत्वाची बाब आहे. प्राधान्यक्रम ठरवून कामाला वेळेत पूर्ण करण्याची सवय लावून घेतल्यास कामाचा ताण न येता काम केल्याचे समाधान मिळते.

            आपण कोणत्या भूमिकेत आहोत आणि त्याची मागणी काय आहे याचा अभ्यास आणि सराव अभिनेते करीत असतात. सराव उत्तम झाल्यास सादरीकरण उत्तम होते. त्याच पद्धतीने कामाचा अभ्यास केला पाहिजे. प्राधान्यक्रमानुसार त्याला वेळ दिल्यास आपण काही कालावधीनंतर तेच काम सहजरित्या कमी वेळात पूर्ण करू शकतो. एकदा यात यश मिळाले की, आपोआप आत्मविश्वास वाढतो आणि कामाप्रती सकारात्मकता देखील वाढते.

            Work Life Balance दाखवणारे तक्ते आपणास मोबाईल मध्येच बघायला मिळतील. कोणत्या बाबीसाठी किती वेळ आपण दिला याचा आलेख मोबाईल ठेवतो. या ‘सोशल मीडिया’ साठीचा काळ अधिक असेल तर आपले कामावरील लक्ष कमी होत आहे हे लक्षात घ्यावे.

            कोणतेही तंत्रज्ञान नाण्यासारखे असते याला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन बाजू असतात. मोबाईलच्या तंत्रज्ञानाने आपले संपर्काचे रुपांतर कार्यवृद्धीत करायला हवे मात्र त्याची दुसरी बाजू ही कामाची गती कमी करणारी आहे. मोबाईल संपर्काचे साधन आहे पण वाहन चालवताना मान वाकडी करून त्यावर संभाषण करण्याची तातडी नक्की आहे का ?, असे करून आपण धोका आमंत्रित करीत आहोत याचीही जाणीव आपण ठेवत नाही.

            जय आणि विरू चा शोले आजही ताजा आहे. अद्याप त्यात जयचे नाणे दोन्हीकडून ‘हेड्स’ दाखवते याचा खुलासा शेवटी होतो. आपण मोबाईलचा वापर तसा तर करीत नाही नाही हे या निमित्ताने आपण स्वत:ला विचारण्याची वेळ आता आली आहे.

            कोरोना नंतरच्या न्यू नॉर्मल मध्ये नोकरी सोडण्याची एक मोठी लाट आयटी क्षेत्रात आली. कारण सर्वांना जगलं पाहिजे याचं भान आलं.  मात्र आजही पिढी पुन्हा स्पर्धेत धावायला लागली आहे हे देखील तितकेच खरे आहे.

            आता सिंहावलोकन करताना नवीन संकल्पांची तयारी देखील करा आणि येत्या नववर्ष दिनी साध्य असा संकल्प करा…करताय ना सुरुवात…!

प्रशांत दैठणकर

9823199466

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!