छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत देशातील खाद्यतेलांचे उत्पादन वाढविणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी उन्हाळी हंगाम 2025 साठी भुईमुग आणि तिळ पिकांसाठी 100 टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरणाची योजना राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भुईमुग पिकाचे तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तिळ पिकाचे प्रमाणित बियाणे मोफत देण्यात येणार आहे. भुईमुगसाठी हेक्टरी 150 किलो आणि तिळासाठी हेक्टरी 2.5 किलो इतके प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. प्रति लाभार्थी किमान 0.20 हेक्टर ते जास्तीत जास्त 1 हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ देण्यात येईल.
शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांकडील भुईमुग बियाण्याचे 20 किलो किंवा 30 किलो पॅक तर तिळ बियाण्याचे 500 ग्रॅम किंवा 1 किलो पॅक उपलब्ध आहेत. क्षेत्रानुसार आवश्यकतेपेक्षा पॅकिंग साईजमुळे बियाणे अधिक झाल्यास त्यातील जादा बियाण्याची रक्कम शेतकऱ्यांना स्वहिश्याने भरावी लागणार आहे.
प्रमाणित बियाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in → FarmerAgriLogin या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे. ‘प्रमाणित बियाणे वितरण प्रात्यक्षिके, फ्लेक्झी घटक – औषधे व खते’ या टाईलमध्ये अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी Agristack पोर्टलवर नोंदणी बंधनकारक आहे.
लाभार्थी निवड लक्षांकाच्या अधीन राहून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (ICFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक सर्व शेतकरी बांधवांनी तात्काळ अर्ज सादर करून प्रमाणित बियाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
