नांदेड – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात साफसफाई व आरोग्यास धोकादायकक्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेचा संबंधित पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.
हाताने मेहतर काम करणाऱ्या/ मानवी विष्ठाचे व्यक्तीचे वहन करणाऱ्या व्यक्ती. बंदिस्त व उघड्या गटाराची साफसफाई करणाऱ्या व्यक्ती. मेलेल्या जनावरांची कातडी कमावणारे आणि कातडी सोलणारे. कचरा गोळा करणारे, उचलणारे. मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स ऍक्ट 2013 मधील सेक्शन 2(1)(d) नुसार धोकादायक सफाई व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते.
या योजनेअंतर्गत इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनिवासी, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी वार्षिक रुपये 3 हजार 500 तसेच इयत्ता 3 री ते 10 वीमध्ये शिकणाऱ्या निवासी (शिक्षणासाठी बाहेरगावी राहात असलेले) विद्यार्थ्यांना वार्षिक रुपये 8 हजार रुपये शिष्यवृत्ती रक्कम अदा करण्यात येते.
या योजनेसाठी पालक हे उपरोक्त नमूद अस्वच्छ, साफसफाई क्षेत्रात व्यवसाय करीत असल्याबाबत पुढील प्रमाणे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत क्षेत्र:- ग्रामसेवक व सरपंच. नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्र:- मुख्याधिकारी. महानगरपालिका क्षेत्र:- आयुक्त / उपायुक्त. सदरील प्रमाणपत्राचा विहित नमुना सर्व नगरपालिका व गटशिक्षणाधिकारी,गट साधन केंद्र यांचे कार्यालयात उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची पद्धत
सदरील योजनेसाठी अर्ज करण्याकरिता विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी महाडीबीटी पोर्टल प्रणालीच्या www.prematric.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरावयाचे आहे. सदर ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुख्याध्यापक यांनी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र व पालकाचे हमीपत्र पोर्टलवर अपलोड करावयाचे आहे. सदर योजना स्वयं अर्थसहाय्यित शाळेसाठी लागू नाही. तसेच विद्यार्थ्याला फक्त एकाच मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल.
सदरील योजना सर्व जाती धर्माच्या व्यक्तींसाठी लागू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही उत्पन्नाची अट नाही. विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती किमान 75 टक्के असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्ती च्या लाभची रक्कम पालकांच्या आधार संलग्नीत बँक खात्यावर दोन हप्त्यामध्ये जमा करण्यात येते. साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यासाठी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही योजना राबविण्यात येते, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी दिली.
