डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात   जलद कार्यवाहीमुळे वृद्धरुग्ण सुखरूप घरी रवाना 

नांदेड – दिनांक 14 नोव्हेंबरपासून बेपत्ता असलेले वय 80 वर्षांपेक्षा जास्त असलेले प्रवृद्ध रामकिशन पांडे यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या मुलाकडे सुखरूप हस्तांतरित करण्यात आले. 19 नोव्हेंबर 2025 रोजी पायाला गंभीर जखम असलेल्या या अनोळखी वृद्धाला 108 रुग्णवाहिकेमार्फत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील शल्यचिकित्सा कक्ष क्रमांक 3 मध्ये दाखल करण्यात आले. यापूर्वी ते हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर तब्बल तीन दिवस पडून होते. स्टेशन मास्टर यांनी 108 ला कॉल करून माहिती दिल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

रुग्णाची ओळख पटत नसल्याने त्यांची नोंद ‘अनोळखी रुग्ण’ म्हणून करण्यात आली. त्यानंतर समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) राजरत्न केळकर यांनी रुग्णाचा व्हिडिओ तयार करून जीवनज्योती फाउंडेशनचे दीपक पवार यांच्याशी संपर्क साधला. दोघांच्या पुढाकाराने हा व्हिडिओ रुग्णाची मुलगी उर्मिला पाठक (कल्याण) व मुलगा मनोज पांडे (वाराणसी उत्तर प्रदेश) यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला.

मुलगा मनोज पांडे यांनी 36 तासांचा प्रवास करून नांदेड येथे येत वडिलांची ओळख पटविली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी वडील कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले होते. त्यांनी वृद्धाश्रम, पोलीस स्टेशन आणि नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु काहीही माहिती मिळाली नाही.

रामकिशन पांडे यांनी सांगितल्यानुसार ते कल्याण येथे मुलीकडे जाण्यासाठी निघाले होते परंतु वाढत्या वयामुळे मार्ग चुकून वाराणसीहून नांदेडला पोहोचले आणि तेथे आजारी अवस्थेत पडून राहिले.

रुग्णालयातील वास्तव्या दरम्यान परीसेविका प्रतिभा वाघदरीकर, अधिपरीचारीका रिता होंडे, वैशाली सोळंके तसेच अधिसेविका बी. आर. मुदीराज यांनी रुग्णाची अत्यंत मनापासून सेवा-शुश्रूषा केली. त्यांच्या सेवेमुळे प्रभावित होऊन मुलगा मनोज यांनी विशेष आभार व्यक्त केले.

रुग्णांचे उपचार प्रा. डॉ. अनिल देगावकर (विभागप्रमुख शल्यचिकित्साशास्त्र विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनील बोंबले यांच्या पथकाने केले. अनोळखी रुग्णाची ओळख पटवून त्यांना कुटुंबाशी एकत्र करण्याची ही मोहीम अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवानंद देवसरकर यांनी यशस्वीरीत्या राबविली. आज 3 डिसेंबर 2025 रोजी अनोळखी रुग्ण रामकिशन पांडे यांना अधिकृतपणे त्यांच्या मुलाकडे सुपूर्द करण्यात आले. सोडत देताना त्यांच्या डोळ्यात  आनंदाश्रू  दाटून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!