राज्यातील २४ विद्यापीठातील ३३०७ खेळाडूंचा सहभाग
नांदेड (प्रतिनिधी)- राज्यपाल यांच्या कार्यालयामार्फत पुरस्कृत २७ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव – २०२५ यावर्षी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दि. ४ ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील विविध विद्यापीठांच्या क्रीडापटूंना एकत्र आणणारा हा भव्य सोहळा विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर रंगणार आहे.
या क्रीडा महोत्सवात बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कब्बडी, बुद्धिबळ आणि ॲथलेटिक्स (रनिंग, उंच उडी, लांब उडी इत्यादी) या आठ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. राज्यातील २४ विद्यापीठातील १७२१ मुले आणि १५८६ मुली असे एकूण ३३०७ खेळाडू सहभागी होणार आहेत. खेळाडूसह मार्गदर्शक आणि व्यवस्थापकांची संख्या ५७६ असणार आहे. तसेच या स्पर्धेकरिता २७६ पंचांची नियुक्ती विद्यापीठातर्फे करण्यात आलेली आहे.
विशेष म्हणजे यावर्षी मा. राज्यपाल महोदयांच्या सुचनेनुसार विद्यापीठाने पहिल्यांदाच ‘भारत पोर्टल’ नावाने लिंक तयार केलेली आहे. या लिंकद्वारे यावर्षी स्पर्धा भारतभर बघता येणार आहेत. असा प्रयोग करणारे ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड’ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे. आणि हा विद्यापीठासाठी एक बहुमान आहे.
क्रीडा महोत्सवाची जय्यत तयारी विद्यापीठ परीसरामध्ये सुरु आहे. याकरिता विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर आणि प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन, तांत्रिक, पात्रता, निवास, वैद्यकीय, अहवाल लेखन, निधी संकलन, खरेदी व वित्त, सांस्कृतिक, क्रीडा ज्योत, बक्षीस वितरण, पाणी वाटप, विद्युत व्यवस्था, प्रोटोकॉल व फ्लॅग, तक्रार निवारण, वाहतूक, भोजन प्रसिद्धी व वृत्तांकन, स्वच्छता, क्रीडा साहित्य वाटप, कार्यालयीन कामकाज आदी २८ समित्या स्थापन करण्यात आलेली आहेत. सर्व समित्यांमध्ये विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यापीठ परिसरातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी आदींचा समवेश आहे.

क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन:
महोत्सवाचे उद्घाटन दि. ४ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य मा. श्री. अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर राहतील.
उद्घाटन प्रसंगी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. ना. माणिकराव कोकाटे, बहुजन कल्याण, दुग्ध व्यवसाय व अक्षय ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अतुल सावे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ना. मेघनाताई बोर्डीकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप-महानिरीक्षक शहाजी उमाप यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.
याशिवाय परभणीचे खासदार संजय जाधव, राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे, लंगरसाहेब गुरुद्वारा, नांदेडचे संत बाबा बलविंदरसिंघजी महाराज, राज्यसभा सदस्य फौजीया खान, नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर, नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नायगावचे आमदार राजेश पवार, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, शिवछत्रपती व अर्जुन पुरस्कार विजेती सारिका काळे तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सर्व मान्यवर सदस्य यांच्यासह महोत्सवाचे स्वागताध्यक्ष विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन उपस्थित राहणार आहेत.
क्रीडा महोत्सव: बक्षीस वितरण समारंभ:
चार दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थानीही कुलगुरू डॉ. मनोहर चासकर राहतील.
या वेळी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, लोहाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, देगलूरचे आमदार जितेश अंतापुरकर, हदगावचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर, विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील, भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण, किनवटचे आमदार भीमराव केराम, मुखेडचे आमदार तुषार राठोड, नानकसर गुरुद्वारा, झरीचे बाबा सुखविंदरसिंघजी, तसेच बाबा दीपसिंघजी गुरुद्वारा, कौठ्याचे बाबा कुलदीपसिंघजी यांच्यासह विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सर्व मान्यवर सदस्य, महोत्सवाचे स्वागताध्यक्ष विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने यांनी या दोन्ही समारंभांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या पत्रकार परिषदेस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी संबोधीत केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
