संचारसाथी नव्हे तर जनतेवर लादलेल्या डिजिटल बेड्या आहेत!
केंद्र सरकारने 28 नोव्हेंबरच्या रात्री नऊच्या सुमारास अक्षरशः लोकशाहीच्या बोंबलावर परिपत्रक फेकले. संचारसाथी’ नावाचा ॲप आता प्रत्येक भारतीयाच्या मोबाईलमध्ये अनिवार्य! मोबाईल भारतातला असो वा परदेशातून आयात झालेला, प्रत्येक फोनमध्ये हा सरकारी गुप्तहेर घालूनच विक्री करा, असा स्पष्ट हुकूम मोबाईल कंपन्यांवर टाकला गेला.पण या संपूर्ण प्रकरणात सर्वात विचित्र व संतापजनक बाब म्हणजे,दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे उघडपणे खोटी माहिती देणे.
श्रीमंतजी,आपण राजघराण्याचे वारसदार, शेकडो वर्षांच्या इतिहासाचे ज्येष्ठ प्रतिनिधी.मग असा उघड खोटेपणा का? श्रीमंतजी, तुम्ही खोटे का बोलत आहात?नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे “अनिवार्य” लिहिलेले असताना आपण म्हणता,“ॲप वापरायचा नसेल तर डिलीट करा.”हे काय जनतेला मूर्ख समजण्याचे काम आहे का? श्रीमंतजी,तुमचा इतिहास प्रचंड भारदस्त आहे—परंतु तुमची आजची वागणूक त्या इतिहासालाच कलंक लावते आहे.हे खोटेपणाचे बोजे तुमच्या वारशालाही वाकवतील, हे तुम्हीच पाहत नाही का?


या ॲपचे स्वरूप तर आणखी भयानक!
- सरकारला तुमच्या मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ, कॉल डीटेल्स, संदेश, लोकेशन—सगळ्यावर हक्क
- फोनचा स्लीप मोड, व्हायब्रेशन मोड—सगळा कंट्रोल केंद्र सरकारच्या हातात
- आधी विकलेल्या मोबाईलमध्येही जबरदस्तीने सॉफ्टवेअर अपडेटद्वारे घुसवणे
- आणि सर्वात घातक—हा ॲप हटवता येणार नाही, डिसेबल करता येणार नाही
हे ‘ॲप’ नसून सर्व्हिलन्सचा लोखंडी पंजा आहे.
नागरिकांच्या खाजगी जीवनावर इतकी निर्लज्ज हस्तक्षेपाची परवानगी देणे म्हणजे थेट जनतेवर हेर बसवणे!आणि वरतून जगासमोर थेट उघड झालेले सत्य—
ॲपलने भारत सरकारला नकार.
“आम्ही हा ॲप आयफोनमध्ये घालणार नाही.”
मग आता प्रश्न—
ॲपल मोठं की भारत सरकार?
अमेरिकन कंपनीची मर्जी जास्त की आपल्या लोकशाहीची प्रतिष्ठा?
श्रीमंतजी,
इतिहासाने तुम्हाला महाल दिला, सत्तेचे दरवाजे दिले, प्रतिष्ठेचे मुकुट दिले.
पण तुम्ही जर असे खोटे बोलत राहिलात तर ती प्रतिष्ठा उडवून लावणे तुम्हालाच महागात पडेल.
जनतेला आपल्या संदर्भाने विचार पडू लागला आहे,
“पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिला है उस जैसा…”
आपला रंग कोणत्या सत्ताकुंडात मिसळला गेलाय?ही गोष्ट आता लपून राहिली नाही.भारत हळूहळू नव्हे—तर सरळ धावत—लोकशाहीपासून हुकूमशाहीकडे झेपावत आहे.‘संचारसाठी’ हा त्या मार्गावरील सर्वात मोठा, सर्वात धोकादायक टप्पा आहे.
