नांदेड – आज 3 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ तसेच तहसीलदार संजय वारकड यांच्या निर्देशानुसार नांदेड तहसील प्रशासन व लिंबगाव पोलीसांच्या पथकाने पहाटे मोठी कारवाई केली. एकूण 49 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट तर 20 लाख रुपये किंमतीची 5 इंजिन जप्त करून लिंबगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली.
नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी कुणाल जगताप, मोहसीन सय्यद, ग्राम महसूल अधिकारी माधव भिसे, संजय खेडकर, महेश जोशी, मनोज जाधव, तलाठी मारोती श्रीरामे, मनोज सरपे, महसूल सेवक बालाजी सोनटक्के, शिवा तेलंगे यांच्या पथकाने पहाटे 5 वाजता विष्णुपुरी, कल्लाळ परिसरात गस्त घालत असताना अवैध वाळू उत्खनन करणारे इंजिन व बोटी नदीमार्गे पळून गेल्याचे निदर्शनास आले.
पथकाने तात्काळ पाठलाग करून बोरगाव तेलंग परिसरात गोदावरी नदीमध्ये 3 बोटी आणि 5 इंजिन जप्त करण्यात यश मिळविले. मजुरांच्या साहाय्याने 3 बोटी स्फोट करून नष्ट करण्यात आल्या तसेच 25 तराफे जागेवरच जाळून नष्ट करण्यात आले. 5 इंजिन जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली.कारवाईदरम्यान पोलीस उपनिरीक्षक सय्यद तसेच पोलीस कर्मचारी रमण बैनवाड, मोरे, गर्दनमारे, तेलंग, देशमुख आदींचे पथक उपस्थित होते.अवैध वाळू उत्खननाविरोधात कठोर व सततची कारवाई सुरूच राहील असा स्पष्ट इशारा नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे.
संबंधित व्हिडीओ ….
