नांदेड(प्रतिनिधी)-सक्षम ताटेची प्रेमीका आँचल उच्च शिक्षण घेवू इच्छीत आहे आणि ते शिक्षण तिला वंचित बहुजन आघाडी मिळवून देईल असे अंजलीताई आंबेडकर यांनी सांगितले.
सक्षम ताटेचा खून झाल्यानंतर तो आवाज प्रसार माध्यमांनी देशभर गाजविला. त्यानंतर अनेक जण सक्षम ताटेच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी आले. आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी सौ.अंजलीताई आंबेडकर या नांदेडला आल्या होत्या. त्यांनी नांदेड येि आँचलची भेट घेतली आणि सोबत कौठा येथील अपघातात मरण पावलेला लहान बालक प्रणव आचार्य आणि त्यांचे आजोबा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटूंबियांना भेटून सुध्दा सांत्वन केले.
सौ.अंजलीताई आंबेडकर या जेंव्हा आँचलशी भेटल्या तेंव्हा तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला हिम्मत दिली आणि सोबतच तुला अधिकारी व्हायचे होते ना त्यासाठी प्रयत्न करून सक्षमचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पुर्ण मेहनत घे, या प्रकरणात जास्त लोकांना जोडू नका त्यामुळे प्रकरणाचा पाठपुरावा योग्य होणार नाही त्यामुळे कुटूंबाने एकत्रित विचार करुन कायदेशीर कामाची जबाबदारी एकाच व्यक्तीवर सोपवावी असा सल्ला दिला.
सौ.अंजलीताई आंबेडकर यांनी सांगितले की, आँचलने सक्षमच्या मृत्यूनंतर दाखवलेली हिम्मत महत्वपुर्ण आहे. त्यामुळे तिला समाजाने आधार देण्याची गरज आहे. तिच्या पुढील शिक्षणासाठी जे काही करायचे आहे ते सर्व वंचित बहुजन आघाडी करेल असे त्यांनी सांगितले. सोबतच या प्रकरणात काही पोलीसांनी आरोपींना उचकवून लावल्याची बाब पत्रकारांनी विचारली तेंव्हा सौ.अंजलीताई आंबेडकर यांनी सांगितले की, आजच्या परिस्थितीत पोलीसांकडे जे काही प्रकार येतात त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुस्लिम समाज, भटके लोक यांच्याबद्दल पोलीसांची भावना ही अत्यंत डागाळलेली आहे. ती डागाळलेली आपली प्रतिमा दुरूस्त करण्यासाठी पोलीसांनी प्रयत्न करावाच लागेल.
आँचलने सक्षमच्या मृत्यूनंतर दाखवलेली हिम्मत महत्वपुर्ण-अंजलीताई आंबेडकर
