नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे, इतवारा वाहतूक विभाग आणि आरटीओ कार्यालय यांच्या संयुक्त पथकाने आज दुपारी विशेष मोहीम राबवून वाहनचालकांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ४७ वाहनांची तपासणी करण्यात आली असून १२ वाहनांकडून ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दोन तास चाललेल्या या मोहिमेत विविध नियमभंगांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी १२ ते २ या वेळेत ही संयुक्त तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. कागदपत्रांशिवाय चालणारी वाहने, अवैधरीत्या भरधाव वेगात धावणारी वाहने, क्षमतेपेक्षा अधिक माल भरून जाणारे वाहनधारक, चुकीच्या दिशेने वाहन चालवणारे चालक अशा विविध नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
प्रसिद्धीसाठी पाठवलेल्या छायाचित्रांमध्ये वाहनांचे नोंदणी क्रमांक स्पष्ट दिसत नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच या परिसरात विना नोंदणी क्रमांकाने धावणाऱ्या अनेक वाहनांवरही कडक कारवाई करावी, अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे.

आजची कारवाई पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीणचे पोलीस अधीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, नितीन मुसळे, मुपडे, मोरे, कवठेकर, मेखलवाड, इतवारा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जगन पवार, पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उप निरीक्षक अमित देऊळकर तसेच आरटीओ अधिकारी अमर पायधन यांनी संयुक्तरीत्या केली.
