काय झाडी, काय डोंगर… पण निवडणुकीत मात्र सर्वच ‘ओके’ नाही!

 

एरवी निवडणूक आयोगाच्या प्रत्येक निर्णयाला डोक्यावर घेऊन नाचणारे भाजप नेते महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 48 तास आधी थांबवण्याच्या निर्णयावर मात्र अचानक बिथरले. निवडणूक आयोगाने निवडणुका रद्द केल्या नाहीत फक्त फ्रिझ केल्या. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “निवडणूक आयोगाने कायद्याचा स्पष्ट चुकीचा अर्थ लावला.”

 

दरम्यान, आसाममध्ये “काय झाडी काय डोंगर, सर्व ओके” म्हणत सरकारची स्तुती करणाऱ्या शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावरच निवडणूक काळात महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “मी बापूंसोबत आहे.” आणि फडणवीस यांचे प्रतिपादन “यात सत्ता-विरोधी असा फरक नाही; माझीही गाडी तपासली जाते.”पण वाचकांनो, या शब्दांवर तुमचा विश्वास बसेल का, हा खरा प्रश्न आहे.

 

निवडणूक आयोगाने शनिवारी आदेश लागू केला, पण पारदर्शकता मात्र शून्य. प्रसारमाध्यमांनाही आज मंगळवार झाला तरी स्पष्ट माहिती दिलेली नाही. मतदान सुरू असतानाही गोंधळ कायम. ज्या ठिकाणी निवडणुका थांबवल्या, तिथे संपूर्ण प्रक्रिया पुन्हा होणार का? याचे स्पष्टीकरण नाही. कारण निवडणुका “फ्रिझ” असून प्रक्रिया जिथे थांबली तिथूनच सुरू होणार, म्हणजे गोंधळाला औपचारिक शिक्का.

 

सांगोला येथे शहाजी बापूंची सभा संपताच त्यांच्या कार्यालयावर धाड—हे योगायोग नाहीच.जे “काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल,सगळं ओके” म्हणत फिरले, त्यांना आज त्यांच्या कृतींचेच फळ चाखावे लागत आहे, हे उघड आहे.

 

निवडणुका थांबवण्याच्या प्रकरणी विचार केल्यास निवडणूक आयोग महाराष्ट्रात अतिशय “स्वतंत्र” आहे म्हणावे लागेल, किंवा फडणवीस यांच्या राजकीय नाटकीपणाला उधाण आल्याचे मानावे लागेल. सर्वोच्च न्यायालयीन प्रक्रियेनंतर आरक्षण 50% वर जाण्याची शक्यता दिसताच आयोगाने भारताच्या सॉलिसिटर जनरलला पत्र लिहून सल्ला मागितला. म्हणजे आयोग कोणाच्या मर्जीनुसार काम करतो, हा प्रश्न उपस्थित होतो.

 

आयोगावर टीका झाली की भाजपची आगपाखड सुरू होते. पण आज मात्र फडणवीस थेट आणि धारदार बोलले. त्यांचा मथळा “कोणी कोर्टात गेला म्हणून निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत.”तथ्ये मात्र गोंधळाची. वर्तमानपत्रात स्पष्ट आकडे नाहीत. कुठे निवडणूक, कुठे स्थगितीफक्त अंधार. जिल्हाधिकाऱ्यांकडून फक्त यादी घेऊन संकलन करायचे. काम अवघड नाही, पण आयोग मात्र अजूनही ढिम्म. मतदार गोंधळले, माध्यमे गोंधळली लोकशाहीचा चिखल माखलेला चेहरा उघडा पडला.बिनविरोध निवडणूक असलेल्या काही जागांत उमेदवारांनी अर्ज मागे घेतले—दहशतीची सावली असल्याचे आरोप. सरस्वती शिंदे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर राजन पाटलांची बाजू कशी बळकट झाली, हे स्पष्ट आहे.

 

आयोगाच्या नियमांनुसार आता थांबवलेल्या निवडणुका जिथे थांबल्या तिथूनच पुढे आणि सांगोल्यात शहाजी पाटलांच्या कार्यालयावर चार-पाच तासांची तपासणी. भारतीय जनता पार्टी,शेतकरी कामगार पक्ष,दीपक देशमुखांचा थेट सामना शहाजी पाटलांशी असताना नेमकी त्यांच्यावरच कारवाई योगायोग म्हणावा की राजकीय शस्त्रक्रिया?

फडणवीस म्हणतात, “माझीही गाडी तपासली जाते.”

पण जनता विचारते, योगायोग की निवडक लक्ष्य?

आज दिसते ते एवढेच की भाजपने आपली ‘कुबडी’ फेकायला सुरुवात केली आहे. ऑपरेशन कुबडी समाप्तीचा पहिला टप्पा सांगोल्यात उलगडला. यावरूनच लोकांना आता समजू लागले आहे की भाजपची खरी ओळख काय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!