“विरोधक जागे झाले तर बॅलेट पेपर परत आणून दाखवतो”— ऍड. आंबेडकरांचा मोठा दावा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, आजच्या परिस्थितीत केंद्रातील नेतृत्वाला हरवणे कठीण नाही, आणि त्यासाठी त्यांच्या कडे आवश्यक अशी “रचना” आहे.
सध्या विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या काही राज्यांत निवडणुका येत आहेत. त्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी संपर्क साधला, तर कोणतीही अट न ठेवता मदत करण्यास मी तयार आहे, पण ती चर्चा आत्ताच झाली पाहिजे. निवडणुकीच्या १५ दिवस आधी काहीच शक्य होत नाही, असे ते म्हणाले.

ऍड.आंबेडकर म्हणाले, “मी निवडणुका पुन्हा बॅलेट पेपरवर आणू शकतो, हे प्रत्यक्ष दाखवून देण्याची क्षमता माझ्यात आहे.”त्यांच्या बद्दल बोलताना पत्रकार दीपक शर्मा यांनी स्पष्ट केले की ते केवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून नव्हे, तर आजच्या परिस्थितीतील एक समर्पित समाजसेवक आणि राजकीय विचारधारा असलेले कार्यकर्ते म्हणून काम करतात.

ऍड.आंबेकरांच्या मते, आजचे अनेक विरोधी पक्ष नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) धोरणांना पूर्णपणे समजू शकत नाहीत. त्यांनी राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, एम.के. स्टालिन, उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची नावे घेतली.आंबेडकर म्हणाले, “विरोधकांनी प्रथम RSS ची रणनीती समजून घेतली, तर भाजपाला हरवणे काही मोठे आव्हान नाही.”

एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात राज्यात झालेल्या एकूण मतदानाची आणि प्रत्यक्ष मोजणीची आकडेवारी, तसेच बीएलओ व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील परिशिष्ट क्रमांक 44 आणि 54 मागितले होते.
मात्र, माहिती अधिकारातून विचारणा करूनही निवडणूक आयोगाने ती माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर दिल्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका केली. न्यायालयाने मात्र “तुम्ही एकटे हा अर्ज दाखल करू शकत नाही” असे सांगून याचिका फेटाळली.
यासंदर्भात आंबेडकर म्हणाले,“जर विरोधी पक्षांचे नेते, महाराष्ट्रात त्या वेळी उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा काँग्रेस  आमच्या सोबत उभे राहिले असते, तर आम्ही हा मुद्दा अधिक सक्षमपणे न्यायालयात सिद्ध करू शकलो असतो.”

त्यांच्या मते, जर पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या नाहीत, तर
– पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात
– तमिळनाडूमध्ये एम.के. स्टालिन यांच्यासाठीही परिस्थिती कठीण होऊ शकते

आंबेडकरांनी सांगितले की, पंतप्रधान चंद्रशेखर, देवेगौडा, नरसिंह राव आणि रामकृष्ण हेगडे यांना RSS ची धोरणे व्यवस्थित समजत होती, म्हणून त्यांचा काळ सुरळीत गेला.आजचे अनेक विरोधी पक्ष नेते मात्र RSS ला नीट ओळखू शकत नाहीत, असे त्यांना वाटते.

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यशस्वी होतील की नाही, हे अतिशय मागास प्रवर्गाला ते किती प्रभावीपणे जोडून घेतात, यावर अवलंबून आहे.बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख बहन मायावती बद्दल ते म्हणाले की, त्यांनी अलीकडील एका सभेत भाजपबद्दल कोणतीही टीका केली नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल विविध अटकळी केल्या जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात आगामी निवडणुकांमध्ये त्या कोणती रणनीती स्वीकारतात, यावरूनच त्यांची भूमिका स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!