नांदेड (विशेष प्रतिनिधी)-तेराव्या शतकातील नंदगिरी बुर्जाच्या दुरुस्ती कामादरम्यान नांदेड शहरात एक प्राचीन मूर्ती सापडल्याची माहिती समोर आली आहे. किल्ल्याच्या ढासळलेल्या भागांच्या पुनर्निर्माणासाठी सध्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असून, त्याच कामात एका जागी खोदकाम करताना ही मूर्ती आढळली.
मूर्ती नेमकी कोणत्या कालखंडातील आहे, तिचा सांस्कृतिक किंवा धार्मिक संदर्भ काय आहे, याबाबत स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध नाही. इतिहासकार आणि पुरातत्त्ववेत्त्यांच्या पाहणीनंतरच या मूर्तीचे नेमके स्वरूप समजू शकेल, असे स्थानिक इतिहासप्रेमी सांगतात. प्रारंभीच्या निरीक्षणात ही मूर्ती स्त्रीची असून, तिच्या चेहऱ्यावरील आणि अंगावरील शिल्पवैशिष्ट्यांमधून प्राचीन कलाशैलीचे दर्शन होत आहे. काही भाग तुटलेला असला तरी मूर्तीचे सौंदर्य आजही उठून दिसत आहे.
नांदेड शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले असल्याने पूर्वी येथे नंदी तट असे नाव प्रचलित होते. इतिहासात सन १३१८ मध्ये मोहम्मद बिन तुघलकाने येथे मैदानी किल्ला बांधल्याचा उल्लेख आढळतो. पुढे हा किल्ला बहामनी, अहमदनगर, मोगल, निजाम यांच्या ताब्यात राहून १९४७ नंतर भारत सरकारकडे आला.किल्ल्याच्या परिसरात आजही अनेक जुन्या नगरपालिका कर्मचाऱ्यांची वस्ती आहे, तसेच पाणी शुद्धीकरण केंद्र असल्याने किल्ल्याचे जतन नीट होऊ शकले नाही. मात्र, अलीकडे नंदगिरीचे किल्लेदार हा स्थानिक तरुणांचा ग्रुप पुढे आला असून, किल्ल्याच्या संवर्धनासाठी मोठी मेहनत घेत आहे. ढासळलेल्या भिंती पुन्हा दगडी रचनेत उभारण्याचे काम सुरू आहे.
याच कामादरम्यान सापडलेली ही मूर्ती सध्या नागरिकांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरली आहे. भारतात अनेक ठिकाणी खोदकामात अशा प्राचीन मूर्ती सापडतात; नांदेडमध्ये मिळालेली ही शिल्पकला त्यापैकीच एक दुर्मिळ नमुना ठरू शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे.पुढील काही दिवसांत तज्ज्ञ पथक मूर्तीची पाहणी करून अहवाल देणार असून, त्यानंतर तिच्या कालखंड, शैली आणि ऐतिहासिक महत्त्वाबाबत अधिकृत माहिती मिळण्याची अपेक्षा आहे
