
नांदेड (प्रतिनिधी)- इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी सुमारे पाच वाजता एका 25 वर्षीय युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रत्यक्षात युवकाचा खून गोळी झाडून करण्यात आला की दगडाने ठेचून, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी युवकाचा मृत्यू झाल्याचे मात्र निश्चित झाले आहे.घटनास्थळावर रिकामी पुंगळी सापडली आहे. घटनेमागील कारणांबाबतही विविध दावे करण्यात येत असून प्रेमप्रसंगामुळे हा प्रकार घडला असाही संशय व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबतचे सत्य पोलीस तपासातूनच उजेडात येणार आहे.


प्राप्त माहितीनुसार, सक्षम गोविंद ताटे (वय 25) याच्यावर काही व्यक्तींनी पहेलवान टी हाऊसजवळील मिलिंद नगरमध्ये, आरती चौधरी यांच्या घरासमोर हल्ला चढवला. काही साक्षीदारांनी त्याला गोळी मारण्यात आल्याचे सांगितले, तर काहींनी दगडाने ठेचून ठार केल्याचे वर्णन केले. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अजूनही गूढ आहे.काही जण सांगतात एकूण चार जण आले होते. त्यातील ३ जणांच्या हातात बंदुका होत्या. पण सत्य काय हे पोलिसच शोधू शकतील.

मयत सक्षम गोविंद ताटे
घटनेची माहिती मिळताच इतवारा उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ , तसेच इतर अधिकारी आणि पोलीस अंमलदार तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात हिमेश गजानन मामीडवार आणि सोमेश सुभाष लखे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र त्यांच्या सहभागाबाबतचे सत्य अद्याप तपासात उघड व्हायचे आहे.नांदेड शहर आणि जिल्ह्यात खुनांचे सत्र काही थांबेनाच.
