राज्य नाट्य स्पर्धेतील “स्वप्नपंख” नाटकाने दुर्लक्षित घटकांच्या शैक्षणिक प्रश्नाला केले अधोरेखित

आज ‘तो ती आणि मनोहर’ या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेची होणार सांगता

नांदेड–सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५-२६ च्या प्राथमिक फेरीत नांदेड केंद्रावर मंगळवार ता. २५ रोजी स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेड च्या वतीने दिनेश कवडे लिखित आणि दिग्दर्शित ‘स्वप्नपंख ‘ हे नाटक सादर करण्यात आले. शंकरराव चव्हाण नाट्यगृह नांदेड येथे झालेल्या या प्रयोगाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

मनुष्य जन्मताना पंख घेऊन येत नाही. पण त्याच्या स्वप्नांना मात्र पंख असतात आणि त्या पंखांना बळ देण्याचं काम हे शिक्षण करत असतं हे स्वप्नपंख या नाटकाने आधीरेखित केले. “स्वप्नपंख” हे नाटक एका चहा विक्रेता आणि त्याच्या मुलीची गोष्ट नाही तर त्या लाखो कुटुंबांची कहाणी आहे, जे रोज जगण्यासाठी लढतात, धावत राहतात, पडतात, पुन्हा उभे राहतात.

या नाटकातील ज्ञानेश्वर ने हे संघर्ष करणाऱ्या बापाची भूमिका उत्तम रित्या सादर केली. मुलीचं भविष्य वाचवण्याची धडपड तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय व्यवस्था कागद, नियम, राजकारण, धर्माचे खेळ यात गरीब माणूस कसा चिरडला जातो हे या नाटकाच्या माध्यमातून दिग्दर्शक दिनेश कवडे यांनी प्रभाविपणे मांडले. या नाटकातील एका प्रमुख भूमिकेत असलेली आराध्या हीचा अभिनय प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवून गेला. कथेला अनुरूप नैपथ्य, प्रभावी प्रकाश योजना आणि दृशांना अनुसरून संगीत हे या नाटकाचे वैशिष्ट्य होते.

या नाटकातील ज्ञानेश्वर ची भूमिका (शाम डुकरे), विद्या (आराध्या पांचाळ), मंगला (सौ. किरण टाकळे), सलीम (गौतम गायकवाड), रहीम (अथर्व देसाई), मास्तर (संदेश महाबळे), कर्मचारी (डॉ. अजय पाटील), आक्का (शांती वैद्य), पंकज (अमोल कुंटेवाड), दुष्यंत (नागेश डोईबळे), कार्यकर्ता (परीक्षित पांचाळ), अमोल (समर्थ खेडकर), छोटा मुलगा (दिशांत कवडे), नृत्यांगना (सेजल क्रिपलानी, जान्हवी कदम, राखी देशमुख) यांनी पार पाडली. तर नाटकाला प्रभिविपणे सादर करण्यात प्रकाश योजना (प्रतिभा शेंडे, कैलाश पोपुलवाड), संगीत संयोजन व नृत्य दिग्दर्शन (सुधांशू सामलेट्टी), नैपथ्य (दिनेश कवडे व गौतम गायकवाड), रंगभूषा (किरण टाकळे, सुधांशू सामलेट्टी), वेशभूषा (शांती वैद्य, संदेश महाबळे) व गीत रचना (दिनेश कवडे) यांचे मुख्य योगदान होते.

आज सायंकाळी ७ वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारा निर्मित, अतुल साळवे द्वारा लिखित व दिग्दर्शित ‘तो ती आणि मनोहर’ हे नाटक सादर होणार आहे. नाममात्र रु. १५ व रु. १० मध्ये तिकीट दर असलेली ही राज्य नाट्य स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी व सांस्कृतिक कार्य संचालनालायाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!