तीन अक्षरी आडनाव असलेले पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप हे तीन वर्दीधारी शोधतीलच
पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप प्रशिक्षणासाठी गेले असताना नांदेड जिल्हा पोलिसांनी काही वाळू माफियांविरुद्ध कार्यवाही केल्याचा ‘‘महान’’ पराक्रम दाखवला. काल-परवाच देगलूर तालुक्यातील 11 वाळू धक्क्यांचा नऊ कोटी पन्नास लाखांचा लिलाव झाला. ज्यावर बोली रुद्रा अर्थमूव्हर्स या कंपनीने मारली. पण या कंपनीने आपला ठेका थेट नांदेडच्या निमगाव पोलिसांच्या हद्दीत दबदबा ठेवणाऱ्या एका नामांकित वाळू माफियाकडे सोपवला.
आता या वाळू माफियासोबत नांदेड जिल्ह्यातील तीन अक्षरी आडनावाचे वर्दीधारी भागीदार असल्याची चर्चा धुमधडाक्यात सुरू आहे. आणि गंमत म्हणजे या तीन अक्षरी आडनावांच्या वर्दीवाल्यांचा शोध सुद्धा तीन अक्षरी आडनाव असलेले उमापच घेणार,म्हणजे नांदेडमध्ये एक नवीन पेज ड्रामा बघायला मिळणार, ते नक्की.वाळू माफियांमुळे शासनाचा महसूल कसा गळतो, पैसा कसा बुडतो, आणि प्रशासनाला कसे त्रासांचे सोंगट्यांचे डोंगर चढतात. हे तर सर्वश्रुतच. महसूल कायद्यानुसार सूर्यास्त ते सूर्योदय दरम्यान वाळू वाहतूक करण्यास मनाई आहे; पण नियम पाळायला कोणाला वेळ? कायदा आहे म्हणून पाळायचाही कल्पना बहुतेक माफिया आणि काही वर्दीधारी सोयीस्करपणे विसरतात.
वाळूवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी महसूल खात्याची असताना, ‘‘आम्ही आहोत ना’’ या थाटात पोलीस खाते स्वतःच सुपरहिरो बनून कार्यवाही करत बसते. कधी महसूल विभाग तक्रार देतो, कधी पोलीस अधिकारी आणि मग वाळू माफियावर गुन्हा दाखल होतो. शासनाने सुद्धा वाळू धक्के लिलाव करून कायदेशीर उत्खननाची परवानगी दिलेय,पण कायदेशीर आणि बेकायदेशीर यातील फरक कोण बघणार? यावर्षी पावसाचा अतिरेक आणि पुराने घातलेले थैमान पाहता वाळू माफियांची तर ‘‘देव झाली कृपा’’ अशी स्थिती. कारण जितकं पाणी वाहील, तितके मोठे वाळू साठे तयार होतात, आणि हे साठे उकरायला आता माफिया सज्ज आहेत.
देगलूर तालुक्यातील अकरा वाळू धक्क्यांचा नऊ कोटी पन्नास लाखांचा लिलाव झाला. रुद्रा अर्थमूव्हर्सने बोली लावली. कंपनीचे मालक देशमुख यांनी हे अकरा धक्के नांदेड परिसरात ‘चमचमीत’ ओळख असलेल्या एका सेवकाकडे दिले. आणि या सेवकासोबत तीन अक्षरी आडनावाचे तीन वर्दीधारी भागीदार असल्याची चर्चा आता जोर धरतेय.कोण आहेत हे तीन अक्षरी आडनावाचे पोलीस? जरी धंदा सेवकाच्या नावावर असला, तरी “हिंग लावलं तरी लागत नाही, पण रंग मात्र छान बसतो” हा साक्षात् अनुभव इथे येतो. कारण पैसा आणि सत्ता यांच्या नात्यात पारदर्शकता कधीच नसते.हे आम्ही लिहिल्यावर काहीजण म्हणतील,‘‘हे बघा, भुंकतात!’’ हो, आम्ही भुंकतो; कारण आम्ही आमच्या देशाशी, आमच्या संविधानाशी इमान राखतो. चुकलेल्यांना उघड करण्याची जबाबदारी आम्ही स्वतः घेतली आहे.
या तीन वर्दीधारांचा शोध तीन अक्षरी आडनावाचे उमापही घेतील, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. कारण ते आता प्रशिक्षणातून परत आले आहेत. त्यांना माहिती असेलच; नसेल तर या बातमीमुळे तरी होईल.सर्वसामान्यांना कायद्याचा बडगा दाखवणारे हेच वर्दीवाले स्वतः कोणत्या कायद्याने चालतात, याचा विचार करायला त्यांच्याकडे कधी वेळ नसतो. कारण कायदा त्यांच्यासाठी नसतो, तो तर इतरांसाठी असतो.
9 कोटी 50 लाखांचा ठेका घेऊन 50 कोटी कमावण्याचा ‘‘राखीव’’ हिशोब काही जाणकार सांगतात. 5 कोटी सेवकाचे आणि उर्वरित 15-15 कोटी तीन वर्दीधाऱ्यांचे. म्हणजे पन्नास कोटींचा सुवर्ण कारखाना.यातील एक वर्दीधारी तर महामार्गांवर पाणी टाकायचा कंत्राटदार होता ते कंत्राट मात्र महिलेच्या नावाने होते. एक वर्दीधारी तर अनेक त्रासांमधून वाचाला,तरी पण करोडपती होण्याचा हव्यास मात्र सुरूच आहे.तिसरा लोकांना फक्त मी नाही त्यातली म्हणत असतो पण दाराची कडी मात्र नेहमीच उघडी असते.
कोणी कुणाला कशासाठी विकावं हा त्यांचा प्रश्न; पण समाजात काय भरतो हे तरी त्यांनी पहावं.आम्ही भुंकतो? हो, भुंकू. कारण समाजाविरुद्ध दिसणारी प्रत्येक चूक दाखवण्याचं काम आम्हाला आवडतं आणि आमची जबाबदारी आहे, ते आम्ही करतच राहणार.
