नांदेड (प्रतिनिधी) -एकदा १० हजारांची लाच घेतल्यानंतरही समाधान न झालेल्या सोनखेड येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपत नागोराव गीते यांनी पुन्हा एकदा तक्रारदाराकडे लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २० नोव्हेंबर रोजी प्रथम १० हजार रुपये घेतल्यानंतर त्यांनी आणखी १० हजारांची मागणी केली होती. अखेर तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गीते यांना रंगेहाथ पकडले.
प्राप्त माहिती नुसार, २४ नोव्हेंबर रोजी एका तक्रारदाराने दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले होते की, त्याच्या वडिलांच्या नावावर जवळा, ता. लोहा येथे २० गुंठे शेती आहे. १३ नोव्हेंबर रोजी शेजाऱ्यांनी त्यांच्या शेतातील कुंपण तोडून टाकले आणि त्या ठिकाणी ज्वारी पेरणी करण्यास सुरुवात केली. तक्रारदाराचे वडील हे पाहण्यासाठी शेतात गेले असता त्याठिकाणी वाद झाला आणि झोडपाचाही प्रकार घडला. या संदर्भात १७ नोव्हेंबर रोजी सोनखेड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या प्रकरणातील पुढील कार्यवाहीसाठी २० नोव्हेंबर रोजी तक्रारदाराला बोलावून विरोधकांवर कारवाई करण्यासाठी आणखी १० हजार रुपये देण्याची मागणी गीते यांनी केली. याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली. २५ नोव्हेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी झाली आणि तडजोडीनंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गीते यांनी ५ हजार रुपये स्वीकारताच त्यांना सापळा रचून पकडण्यात आले.
कारवाईदरम्यान गीते यांच्या ताब्यातून १५,००० रुपये रोख, एक तोळे सोन्याची चैन, दोन सोन्याच्या अंगठ्या, एक चांदीची अंगठी, एक घड्याळ व मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
गणपत नागोराव गीते (५०) यांच्याविरुद्ध सोनखेड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संदर्भातील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक करीम खान सालार खान पठाण यांनी दाखल केली.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर करणार आहेत. कारवाईत पोलीस निरीक्षक प्रीती जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख रसूल, पोलीस अंमलदार अर्शद अहमद खान, गजानन राऊत, सय्यद खदीर आणि शिवानंद रापतवार यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रामतीर्थ पोलीस ठाण्यात सुद्धा अशीच लाच खोरीची कार्यवाही केल्याची माहिती प्राप्त झाली आहे परंतु त्याची सविस्तर माहिती जसे लाचखोराचे नाव, किती लाच घेतली याबद्दलची माहिती अद्याप आलेली नाही.
