किनवट तालुक्यातील पांगरी येथे जलतारा कार्यक्रमाचा शुभारंभ
लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती
नांदेड- पाण्याच्या शाश्वततेसाठी जलतारा ही योजना एक महत्वपूर्ण मोहिम आहे. पाणी शेतातच, जमिनीतच मूरवणारा प्रकल्प म्हणून आपण आज जलताराकडे पाहतो. यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात एक लक्ष जलतारा शोषखड्डे निर्माण करण्याचा आपण निर्धार केला आहे. यापेक्षाही अधिक जलतारा शोषखड्ड्याचे निर्माण व्हावे याकरिता जलतारा ही योजना एक लोकचळवळ होणे जरुरी असून यामध्ये शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेंवी संस्था व प्रत्येकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
पाणीटंचाई व दुष्काळावर मात करण्यासाठी व पाण्याच्या शाश्वततेसाठी जलतारा ही एक नवसंजीवनी ठरत आहे. जिल्ह्यामध्ये एक लक्ष जलतारा शोषखड्डे शेतीमध्ये निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून आकांक्षित किनवट तालुक्यातील मौजे पांगरी या गावात विभागीय वन अधिकारी (सा.व) संदेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी लक्ष्मण गड्डमवार, बालाजी कदम यांच्या शेतीत मार्कआउट देऊन जलतारा शोषखड्डा कार्यक्रमाचा शुभारंभ तर पांगरी तांडा येथील नाला वर लोकसहभागातून वनराई बंधारा तयार करण्यात आला आहे.
या कार्यक्रमादरम्यान संदेश चव्हाण विभागीय वन अधिकारी, पांडुरंग मामीडवार आकांक्षित तालुका फेलो, सुमेध थोरात सहा.कार्यक्रम अधिकारी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत जलतारा शोषखड्डा उपक्रमाचे महत्व सांगितले आणि जल संवर्धनासाठी सामूहिक सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी श्रमदानातून पांगरी तांडा येथील नालावर वनराई बंधारा तयार करण्यात आला आहे. यामुळे हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे. यावेळी पांगरी ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला स्वयंसहायता समूहातील महिलांनी एका एकरावर एक जलतारा शोषखड्डा तयार करण्याचा निर्धार करून आव्हान स्वीकारत सदर मोहिमेत सक्रिय सहभागाची ग्वाही दिली.
यावेळी सरपंच नितीन नरोटे, वनपरिक्षेत्र अधिकारी इस्लापूर सचिन धनगे, आकांक्षित तालुका फेलो पांडुरंग मामीडवार , वनपाल विठ्ठल गुद्दे, टी.ए देवकत्ते, स.कार्यक्रम अधिकारी सुमेध थोरात, पॅनल तांत्रिक अधिकारी सतिश जाधव, इतर वनविभाग अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी मल्लेश आमडेलू, ग्रामरोजगार सहाय्यक प्रज्ञा कुमार कांबळे तसेच परोटी, जलधारा, शिवणी व इस्लापूर या सर्कल मधील रोजगार सहाय्यक व गावातील शेतकरी महिला ग्रामस्थ हे उपस्थित होते.
जलतारा शोषखड्डे प्रक्रिया एका एकरावर एक खड्डा
पावसाचे पाणी जमिनीच्या उताराच्या ज्या भागात साठते त्याच उताराला पाच बाय पाच फूट लांबी रुंदी व सुमारे सहा फूट खोल असा शोषखड्डा घेऊन यात सुरुवातीला मोठे दगड त्यानंतर थोडे मध्यम आणि सर्वातवरती लहानगिट्टी व वाळू भरण्यात येऊन सदर खड्डा बुजवण्यात येतो आणि या माध्यमातून पाणी झिरपत भुगर्भात साठत जाते.
