लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी तक्रारदार दुकानदाराने दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, गेल्या चार महिन्यांतील पुरवठ्याबाबत शासनाने मंजूर केलेले ५७,००० रुपये कमिशन त्याला मिळाले. नोव्हेंबर 2025 मधील स्वस्त धान्यही प्राप्त झाले होते. मात्र पुरवठा निरीक्षक सुमन कऱ्हाळे यांनी जाणूनबुजून अडथळा आणून संबंधित माहिती मशीनवर अपलोड होऊ दिली नाही. परिणामी, नोव्हेंबर 2025 च्या धान्याचे लाभार्थ्यांना वितरण अशक्य झाले.
त्याचबरोबर, नव्याने तयार झालेल्या २७ लाभार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी, 18 नोव्हेंबर रोजी तक्रारदाराने तहसील कार्यालयात कराळे यांची भेट घेतली. यावेळी कराळे यांनी कंत्राटी संगणक डेटा एंट्री ऑपरेटर गोविंद जाधव यांना बोलावून तक्रारदारासमोरच ५७,००० रुपयांच्या कमिशनपैकी २० टक्के लाचेची उघडपणे मागणी केली.
22 नोव्हेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. सापळा कारवाईदरम्यान सुमन कऱ्हाळे यांनी तडजोड करत १० टक्के, म्हणजेच ५,७०० रुपये लाच, डेटा ऑपरेटर जाधव यांच्याकडे देण्यास सांगितले. ही रक्कम जाधव यांनी स्वीकारताच प्रतिबंधक विभागाने कऱ्हाळे आणि जाधव यांना ताब्यात घेतले.
तक्रारदार पोलीस निरीक्षक प्रीती रमेश जाधव यांच्या तक्रारीवरून हादगाव पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 आणि 7(A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुरवठा निरीक्षण अधिकारी सुमन कऱ्हाळे यांना प्रत्यक्ष ताब्यात घेण्यात आले असून, गोविंद आप्पाराव जाधव यांना वैद्यकीय कारणास्तव नोटीस पाठविण्यात आली आहे.
ही संपूर्ण सापळा कारवाई पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीती जाधव आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अर्चना करपुडे करणार आहेत.
