नांदेड – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली असून दिनांक 2 डिसेंबर रोजी नगरपालिका व नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु काँग्रेस पक्षाने लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी दिलेला उमेदवाराने अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. काँग्रेस पक्षासारख्या मोठ्या पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेऊन नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवार नसल्याचे दिसून आले की त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. यावरून नांदेड चे काँग्रेस पक्षाचे कंट्रोलर कोण आहेत असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे निवडणूक आयोगावर पुराव्यांशी आरोप करत आहेत. त्यात काही तथ्य आहे की नाही हे पुढे निश्चितच सर्वांना कळेल परंतु ते ज्या पद्धतीने आपला पक्ष किंवा आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत याबद्दल खूप जण कौतुक करत आहेत. एकीकडे राहुल गांधी यांच्या प्रयत्न नांदेड जिल्ह्यात स्थानिक खासदार यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार मिळत नसतील आणि मिळाले असतील तर त्यांचे अर्ज मागे घेण्यास भाग पाडत असतील यावरून नांदेडची काँग्रेस कोणत्या दिशेला जात आहे हा मोठा प्रश्न उपस्थित पडला आहे. भारताच्या राजकारणात आतापर्यंत सर्वात मोठा काँग्रेस पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जर उमेदवार भेटत नसेल तर याहून दुर्दैव नाही. निवडणुकीत निवडून येणे हे जनतेच्या हातात असले तरी आपल्या कामाच्या जोरावर निवडून जिंकली जाते. परंतु निवडणुकीत हरण्याच्या किंवा कोणी सांगण्याच्या कारणावरून उमेदवारी अर्ज मागे घेतला याचा अर्थ मॅनेज होऊ शकतो असा मानला जाऊ शकतो. नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण जेव्हा लोकसभा निवडणुकीत निवडून आले तेव्हा नांदेडच्या काँग्रेसला एक नवीन उभारी निर्माण झाल्यासारखे वाटले. परंतु हळूहळू या उत्साहाला काही प्रमाणात ब्रेक लागल्याचे काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यातून बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या पदावर जर वरिष्ठ नेते त्यांना संधी देण्यात कमी पडत असतील किंवा कोणाच्या दबावाखाली सांगण्यावरून उमेदवारी मागे घेण्यास भाग पडत असतील तर नांदेडची काँग्रेस लवकरच सर्व स्तरातून गायब झाल्याशिवाय राहणार नाही असे बोलले जात आहे. नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व त्यानंतर महापालिका निवडणूक होणार आहेत. आगामी निवडणुकीत देखील अशाच प्रकारे जर चालले तर महापालिकेत काँग्रेसचे नगरसेवक कमी निवडून आले तर यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. नुकतीच काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडी सोबत युती केल्याचे जाहीर केले होते. परंतु उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार जाहीर करून एक प्रकारे युती तोडल्याचे जाहीर केले. अशाप्रकारे काँग्रेस नांदेड जिल्ह्यात राजकारण करत आहे. निवडणूक आली की काही नेते पैशाने मोठे असलेल्या व्यक्तींना तिकीट देऊन पक्षाचे नुकसान किंवा स्वतःचा फायदा करून घेताना दिसून येऊ शकतात. अश्या पद्धतीने तिकीट देऊन काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना किंवा ज्यांना पक्षाचे आणि नांदेड शहराचा विकास करायचा आहे ते बाजूला राहतील. याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आहे असे कार्यकर्त्यातून बोलले जात आहे.
– किरण वाठोरे
