नांदेडमध्ये ज्ञानामृत व्याख्यानमाला; कवी रवींद्र केसकरांनी ठेवले सामाजिक वर्मावर बोट
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘जात्यापासून ते नात्यापर्यंत अशी बोलते कविता’ या ज्ञानामृत व्याख्यानमालेत कवी रवींद्र केसकर यांनी सामाजिक वास्तव , जीवनातील सुख-दुखाच्या वर्मावर बोट ठेवणाऱ्या विविध, प्रसिद्ध कवींच्या कविता सादर केल्या. या कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
पीपल्स कॉलेजमधील नरहर कुरुंदकर सभाग्रहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात कवी केसकर यांनी कवी सुधीर मुळीक यांच्या सादर केलेल्या, ‘आता कुठे तिरंगा लक्षात राहतो, मी शेकडो ध्वजांच्या देशात राहतो. सगळ्या विचारधारा केल्यात पाठ मी, सोयीनुसार सगळ्या पक्षात राहतो.’ या विडंबन कवितेने रसिक अंतर्मुख झाले.कवितेसंदर्भात मार्गदर्शन करतांना कवी रवींद्र केसकर म्हणाले कीकविता म्हणणं आणि कविता अंगीकारणं यात प्रचंड फरक आहे. कविता समजून घेण्यासाठी भाषेपेक्षा कवितेतील भाव अत्यंत महत्वाचा तेव्हाच कवितेचा खरा अर्थ कळतो. आपल्या मातृसंस्कृतीतील मौखिक परंपरेचे जतन करत लोककवितांमधील अस्सल भाव जिवंत ठेवल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कविता काय सांगते यापेक्षा काय सुचवते हे महत्वाचे आहे.
‘जन्मा आली लेक, बाप म्हणतो कचरा; माय म्हणते असू दे माझ्या जीवाला आसरा.’ या ओळींचा दाखला देत त्यांनी मराठी मौखिक परंपरेतील सामाजिक संवेदनशीलता उलगडली. कवितेतील अनुभव सांगताना त्यांनी बहिणाबाई चौधरींच्या,‘अरे घरोट्या घरोट्या तुझ्यातून पडे पिठी तसं तसं माझं गाणं पोटातून येते ओठी …’ या ओळींमधून स्त्रीच्या अंतर्मनातील काव्यप्रेरणा स्पष्ट केली. तसेच कवी नितीन देशमुख यांच्या, ‘जेव्हा दिली सीतेने अग्नितली परीक्षा, तेव्हा खरे उजळले चारित्र्य रावणाचे’ या ओळींमधून त्यांनी समकालीन विचारांचा वेगळा दृष्टिकोन मांडला.कार्यक्रमात केसकर यांनी हिंदीमराठी ‘कॉकटेल कविता’ हा नवीन काव्यप्रकार सादर केला. संत नामदेव, अकबर इलाहाबादी, जगदीश खेबुडकर, उर्दू शायरी आणि लावणी यांचा संगम घडवून समाजातील ऐक्य, समानता आणि माणुसकीचा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील होते. अध्यक्षीय समारोपात ते म्हणाले, कविता करण्यासाठी संवेदनशील किंवा विद्रोही मन आवश्यक असते. ज्याच्या मनात प्रेम ओसंडून वाहतं, तोच खरा कवी. रवींद्र केसकर यांच्या काव्यप्रवासाने हृदयाला स्पर्श केला.
कार्यक्रमाला नांदेड एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य नौनिहालसिंग जहागीरदार, जागडिया, शांभवी साले, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख, अरुंधती पुरंदरे, विठ्ठल पावडे, पीपल्स कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, प्रा. ए. टी. शिंदे, प्रा. विलास वडजे,प्रा एकनाथ खिल्लारे, श्री राहुल गोरे, प्रा. विश्वाधार देशमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मोठ्या संख्येने विद्यार्थी, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विशाल पतंगे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. विजय कदम यांनी केले.
