सायबर पोलिसांची गतिमान कार्यवाही : अवघ्या 72 तासांत तक्रारदाराचे चार लाख रुपये परत

नांदेड (प्रतिनिधी)-दिनांक 15 नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या एका तक्रारीनुसार एका व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक होऊन चार लाख रुपये गमावले गेले होते. संबंधित व्यक्तीने तक्रार नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंदवून थेट सायबर पोलीस ठाणे, नांदेड येथे धाव घेतली.तक्रार प्राप्त होताच नांदेड सायबर पोलिसांनी अत्यंत वेगवान आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम कार्यवाही करून संबंधित बँका आणि पेमेंट गेटवेला तात्काळ संपर्क साधला. अवघ्या 72 तासांत फसवणूक झालेली चार लाख रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात यशस्वीरित्या जमा करण्यात पोलिसांना यश आले.

फसवणूक कशी झाली?
तक्रारदाराला एका अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून “ॲक्सिस बँक रिवॉर्ड” नावाची APK फाईल पाठवण्यात आली होती. ती फाईल डाउनलोड करून त्यामधील प्रश्नांची उत्तरे भरताना तक्रारदाराने आपली वैयक्तिक माहिती तसेच क्रेडिट कार्डचे तपशील भरले. ही माहिती मिळताच अज्ञात फसवणूक करणाऱ्यांनी त्याच्या क्रेडिट कार्डवरून चार लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.

ही माहिती तसेच सर्व कागदपत्रे घेऊन तक्रारदाराने नांदेड सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार तातडीने हाताळत तत्परता, समन्वय आणि तांत्रिक कौशल्याचे उत्तम उदाहरण घालून दिले.आज तक्रारदाराने पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची भेट घेऊन पोलिसांनी केलेल्या मदतीबद्दल विशेष आभार व्यक्त केले. यावेळी

  • पोलीस निरीक्षक वसंत सप्रे
  • पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण
  • पोलीस अंमलदार काशिनाथ कारखेडेदीपक राठोडशुभांगी जाधवकांचन कसबेज्ञानेश्वर यन्नावारआदींची उपस्थिती होती.

सायबर पोलिसांचा जनतेला इशारा व आवाहन

सायबर पोलीस विभागाने नागरिकांना खालील सूचना दिल्या आहेत :

  • कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.
  • मोबाईलमध्ये अज्ञात APK फाईल्स डाउनलोड करू नयेत.
  • मोबाईलवर आलेले OTP, पासवर्ड किंवा बँक तपशील कोणालाही देऊ नयेत.
  • जास्त नफा देण्याच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये.
  • सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करू नये.
  • आपल्या सर्व सोशल मीडिया खात्यांना Two-Step Verification लावून ठेवावे.
  • अनोळखी व्यक्तीचे व्हिडिओ कॉल उचलू नयेत.
  • Digital Arrest हा प्रकार हा फसवणुकीचा आहे, त्याला बळी पडू नये.

जर कोणतीही ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर तात्काळ
📞 सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर कॉल करावा किंवा
🌐 नॅशनल सायबर क्राईम पोर्टल वर cybercrime.gov.in या संकेत स्थळावर तक्रार त्वरित नोंदवावी.
त्यानंतर संबंधित सायबर पोलीस ठाण्यात तक्रारीची प्रत जमा केल्यास फसवणूक झालेली रक्कम परत मिळण्याची प्रक्रिया जलद होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!