नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, कौशल्यविकास आणि शैक्षणिक उन्नती साधण्यासाठी विद्यापीठ नेहमीच सकारात्मक आणि आग्रहाची भूमिका घेत आहे. विद्यापीठाशी संबंधित विविध प्रशासकीय व शैक्षणिक अडचणी दूर करून महाविद्यालये आणि विद्यापीठ या दोघांचाही सर्वांगीण विकास साधण्यास विद्यापीठ प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
विद्यापीठातर्फे संलग्नित महाविद्यालयांचे संस्थाचालक व प्राचार्य यांच्यासमवेत सहविचार सभांचे आयोजन दि.१९ व २० नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या आधीसभा सभागृहात करण्यात आले. अध्यक्षीय स्थानावरून संबोधित करताना डॉ. चासकर यांनी विद्यापीठाच्या विकासदृष्टीची रूपरेषा मांडली.
या बैठकीस प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. माधव गव्हाणे, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. डी. एम. खंदारे, डॉ. पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, आयक्यूएसी संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी यांसह विद्यापीठातील अनेक अधिकारी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. चासकर म्हणाले, “संलग्नित महाविद्यालयांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्या अडचणींचे निराकरण आणि भविष्यातील शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.”
ते पुढे म्हणाले, अॅकॅडेमीक अँड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट (AAA) संदर्भात विद्यापीठाची आग्रही भूमिका असून सर्व महाविद्यालयांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे, ज्यामुळे शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्तेत वाढ होईल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 टप्प्याटप्प्याने राबविण्यास सुरुवात झाली आहे आणि सर्वच महाविद्यालयांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. युआयएमएस सॉफ्टवेअरमुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या कामकाजाला अधिक वेग प्राप्त झाला आहे.
परीक्षा पद्धतीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, उत्तरपुस्तिकांचे स्कॅनिंगद्वारे मूल्यमापन सुरू केल्याने प्राध्यापकांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचत असून निकाल वेळेत लावण्यास मदत होत आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करून प्रकरणे जलदगतीने निकाली काढली जात आहेत.
स्टार्टअप संस्कृती बळकट करण्यासाठी विद्यापीठाच्या आग्रही भूमिकेचा पुनरुच्चार करताना त्यांनी प्रत्येक महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना प्रेरित करून नवोन्मेषी स्टार्टअप प्रकल्प तयार करण्याचे आवाहन केले.
दोन दिवस चाललेल्या सहविचार सभेला सुमारे ७० संस्थाचालक आणि १५० प्राचार्य यांनी उपस्थिती लावली. खेळीमेळीच्या वातावरणात विद्यापीठ व महाविद्यालयांच्या विकासासाठी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
