पत्रकारिता म्हणजे सत्तेच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारण्याची कला—सत्तेचं पोथं उचलण्याचं किंवा तोंडाला चाटणं नव्हे. पण मागील अकरा वर्षांनी या देशातील पत्रकारितेचा कणाच गेला आहे. “तुम्ही नाश्त्याला काय खाता?”, “थकत का नाही?” अशा निर्लज्ज प्रश्नांच्या चिखलात आमची पत्रकारिता इतकी रुतली आहे की तिच्या खर्या चेहऱ्याची आठवणही लोक विसरू लागले आहेत.पत्रकारिता विकली गेली तर तिचं काय होतं याचं जिवंत उदाहरण आपण रोज पाहतो. राजाने सांगितलेलं छापणे ही पत्रकारिता नाही; राजाला अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणे हीच खरी परंपरा.
याच संदर्भात, अमेरिकेतील एक प्रसंग कानाखाली वाजवणारा आहे. जगातील सर्वात ताकदवान लोकशाही, सर्वात प्रभावशाली देश,तिथे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर ABC च्या ज्येष्ठ पत्रकार मेरी ब्रुस यांनी जे धाडस दाखवलं, ते पाहिलं की पत्रकारिता म्हणजे काय हे आठवतं. ट्रम्प प्रश्न ऐकून संतापले, मध्येच तिचं वाक्य तोडलं, तिला “terrible reporter” म्हटलं, नेटवर्कचा परवाना रद्द करण्याची धमकी दिली. पण तरीही ही महिला पत्रकार मागे हटली नाही. वाघिणीसारखी उभी राहिली आणि प्रश्न सरळ डोळ्यात डोळे घालून विचारत राहिली.
भारतामध्ये?
इथे पत्रकारांच्या अंगातली शिरशिरीच संपली आहे. “कोणता व्हिडिओ येईल?”, “कोण तपास लावेल?”, “कोर्टात खेचेल?”, “जेलमध्ये टाकेल?”या भीतीतूनच पत्रकारिता गुदमरली आहे. लोकशाहीतील ऑक्सिजन संपत असल्याचा भास होतो. आणि दुर्दैव म्हणजे, आपण या सर्वात मोठ्या लोकशाहीत राहत आहोत,हीच शोकांतिका.

आपल्या इतिहासातही पत्रकारांचे बलिदान कमी नाही. अशिष विद्यार्थी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी-भगतसिंग यांच्यात दुवा साधला आणि स्वातंत्र्यानंतरच्या मेरठ दंगलीत लोकशाही बचावण्यासाठी प्राण दिले. चीनमधील लोकशाही आंदोलने, त्यात रुडी या महिला पत्रकाराने केलेलं काम,फोटो पत्रकार Carter यांची कहाणी,हे सगळं दाखवून देतं की सत्य सांगताना दडपण येणारच, पण दडपणाला कुरवाळणारा माणूस पत्रकार नसतो.आज भारतात “लोणी लावणे”, “चमचेगिरी”, “भाटगिरी”,”पाणी मारणे” हाच जर्नलिझमचा मुख्य धंदा बनला आहे.

अशा वेळी अमेरिकेतील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या समोर निर्भयपणे प्रश्न विचारणाऱ्या मेरी ब्रुस यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या भेटीदरम्यान तिने त्यांच्यावर जमाल खाशोगी यांच्या हत्येबाबत थेट प्रश्न टाकला. तोही व्हाईट हाऊसच्या पत्रकार परिषदेत. ट्रम्प यांच्या रोषाकडे दुर्लक्ष करून.भारतामध्ये असा प्रश्न विचारणारा पत्रकार आज उरला आहे का?
असा प्रश्न विचारला तर इथे भीती असते,आपला NDTV होईल, तपास लागेल, कर विभाग धाड टाकेल, नोकरी जाईल, किंवा जीवच धोक्यात येईल.सर्वात उपरोधिक म्हणजे,देशाचे पंतप्रधान स्वतः “Journalism of Courage” च्या कार्यक्रमात ‘धाडसी पत्रकारिते’चे महत्त्व सांगतात… पण गेल्या अकरा वर्षांत एकही खुली पत्रकार परिषद घेत नाहीत.
मेरी ब्रुस यांनी विचारलेला प्रत्येक कठोर प्रश्न त्या महिला पत्रकाराच्या धैर्याचा पुरावा आहे. ना तिला जेलची भीती, ना मीडिया बंद होण्याची, ना हत्या होण्याची. आणि म्हणूनच प्रश्न विचारताना तिच्या आवाजात कंप नव्हता कणखरपणा होता.भारतामध्ये अशी निर्भीड पत्रकारिता कधी दिसेल?लोकशाही पुन्हा श्वास घ्यायला लागेल का?आपणही आशा ठेवू शकतो,पण आशेवर देश चालत नाही, धैर्यावर चालतो.
