नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे विमानतळच्या हद्दीत राहणाऱ्या एका चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 25 वर्षीय युवकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी जन्मठेप आणि 50 हजार 500 रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात न्यायालयाने निकालाच्या नोंदीमध्ये भारतीय दंड संहितेतील कलम 376 पेक्षा पोक्सो कायद्यातील कलमे ही जास्त गांभीर्याची आहेत असा उल्लेख केला आहे.पिडीत बालिकेला जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाकडून तिच्या पुर्नवसनासाठी नुकसान भरपाई सुनिश्चित क रण्यात आदेश दिले आहेत.
या संदर्भाने प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे विमानतळच्या हद्दीत 6 मार्च 2023 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 3 वाजेदरम्यान एक भयंकर घटना घडली. त्यानुसार माधव उर्फ बाळ्या रमेश जानोळे (25) या युवकाने चॉकलेटसाठी 10 रुपये देण्याचे आमिष दाखवून या नराधमाने 4 वर्षीय बालिकेवर नैसर्गिक आणि अनैसर्गिक पध्दतीने अत्याचार केला आणि तिला खोलीत डांबून ठेवले. त्या बालिकेची आई बालिकेला शोधत असतांना तो नराधम तिलाच विचारत होता की, बालिका कोठे गेली. बऱ्याच वेळानंतर त्या बालिकेच्या आईने आणि इतर नातलगांनी बंद खोलीत असलेल्या बालिकेला शोधले आणि मग बालिकेने जे काही सांगितले ते एवढे भयंकर होते की, अंगावर काटा येवू लागला. बालिकेला जलदगतीने वैद्यकीय उपचार देण्यात आले. अनेक दिवस त्रास भोगून आजही ती बालिका तो त्रास भोगत आहे. त्या नराधमाने केलेल्या अत्याचाराच्या ठिकाणी जमीनीवर रक्तच सांडलेले होते.
या प्रकरणी विमानतळ पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 377, 376(अ)(ब), 376(2)(जे), 323 आणि पोक्सो कायद्याचे कलम 4 आणि 6 नुसार माधव उर्फ बाळ्या रमेश जानोळे विरुध्द गुन्हा क्रमांक 76/2023 दाखल केला. या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रुपाली कांबळे यांनी केला. संपुर्ण पुरावे जमा करून माधव जानोळे विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयात तो विशेष पोक्सो खटला क्रमांक 37/2023 प्रमाणे चालला. या खटल्यात सरकार पक्षाने 11 साक्षीदार तपासले.
या प्रकरणाचा युक्तीवाद करतांना सहाय्यक सरकारी वकील ऍड. एम.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी उपलब्ध तोंडी पुरावे, वैद्यकीय पुरावे यानुसार गुन्हा सिध्द झाला आहे आणि या खटल्यात आरोपीला मृत्यूदंड देण्यात यावा अशी मागणी केली. न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 377 प्रमाणे दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये रोख दंड, कलम 377 (ए,बी) साठी जन्मठेप आणि दहा हजार रुपये रोख दंड ही जन्मठेप त्याच्या नैसर्गिक मरणापर्यंतची आहे. कलम 376(2)(आय)(जे) यातही नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप आणि 15 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. कलम 376(2)(एम) प्रमाणे नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप आणि 15 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. कलम 323 प्रमाणे एक वर्षाची कैद आणि 500 रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी एकाच निकालात तिन कलमांसाठी जन्मठेपेची शिक्षा दिल्याची ही घटना बहुतेक नांदेड जिल्ह्यात पहिलीच असावी. या सर्व शिक्षा माधव जानोळेला एकत्र भोगायच्या आहेत. या खटल्यात शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक रामेश्र्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनात विमानतळचे पोलीस अंमलदार देवप्पा विभुते यांनी पैरवी अधिकारी म्हणून आपले काम पुर्ण केले.

