राज्य नाट्य स्पर्धेतील ‘नटसम्राट’ नाटकाने सभागृह केले हाऊसफुल; शुक्रवारी सादर होणार “ब्रह्मद्वंद्”

६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत रसिकांचा वाढता उदंड प्रतिसाद
नांदेड –  वि. वा. शिरवाडकर यांच्या कालजयी ‘नटसम्राट’ला नांदेडच्या रंगभूमीवर मुक्ताई प्रतिष्ठान देगलूरने प्रभावीपणे पुनर्जीवित केले. ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेअंतर्गत डॉ. शंकरराव चव्हाण नाट्यगृहात बुधवारी (ता.२०) सादर झालेल्या या नाटकाने प्रेक्षकांना सुमारे तीन तास रंगमंचाशी जोडून ठेवले. नांदेडच्या नाट्य रसिकांनी एवढा प्रतिसाद दिला कि सभागृह हाऊसफुल झाल्यानंतर नाट्य रसिकांनी सांभागृहाच्या पायऱ्यांवर बसून देखील नाटक बघणे पसंत केले. शेवटी आयोजकांना तिकिट विक्री बंद करावी लागल. दिग्दर्शक डॉ. मनीष देशपांडे यांची ही प्रस्तुती तांत्रिक मांडणी, अभिनयशैली आणि भावविश्वाच्या जिवंततेसाठी विशेष उल्लेखनीय ठरली.
नेपथ्याची उभारणी नकुल उपाध्याय यांनी अत्यंत नजाकतीने केली. ‘नटसम्राट’सारख्या भावप्रधान नाटकात अवाजवी नेपथ्याचा भपका आवश्यक नसतो; हे भान ठेवत त्यांनी साधेपणा राखून दृश्यांमध्ये वास्तववाद उतरल. प्रकाशयोजना अशोक माढेकर यांनी नाटकातील शांतता आणि ताण या दोन्हीची अचूक जाण ठेवून केली. काही निर्णायक प्रसंगात प्रकाशाचा हळूहळू फास घट्ट होत जाणारा परिणाम पात्रांच्या मानसिक अवस्थेला अधिक उठाव देणारा ठरला. संगीत संयोजन श्रेयस कुलकर्णी यांचे नियंत्रण नाट्यप्रवाहात पूर्णपणे मिसळलेले होते; कोणत्याही क्षणी संगीत पुढे न येता भावना अधोरेखित करण्याचे काम त्यांनी नीट पार पाडले. रंगभूषा गणेश काकडे यांनी पात्रांच्या वय, जीवनातील पडझड, थकवा आणि काळाच्या ओघातील झिज या बाबी अत्यंत इनायतिने दाखवल्या. रंगमंच व्यवस्था सुचिता देशपांडे आणि सागर कुलकर्णी यांनी दोषरहित हाताळली. सहाय्यक म्हणून मयुरेश, माणिक, संतोष आणि सतीश यांनी मागील पडद्यामागील सर्व हालचाली सुरळीत केल्या.
समीक्षणाच्या दृष्टीने सर्वाधिक प्रभावी ठरलेली गोष्ट म्हणजे त्रिम्बक मगरे यांची अप्पासाहेबांची भूमिका. त्यांच्या अभिनयात संवादातील थरार, डोळ्यांतील संभ्रम, स्वतःची किंमत टिकवण्याचा असफल प्रयत्न आणि घरापासून दूर होत जाणाऱ्या कलाकाराची अंतरीची यातना हे सर्व बारकाईने जाणवत गेले. प्रेक्षकांपुढे जणू एक हळूहळू तुटत जाणारा मनुष्य उभाच राहिला. नंद्या साकारणाऱ्या प्रा. सुकृत भोसकर यांनी अप्पासाहेबांच्या भावविश्वातील परिस्थिती समतोलपणे समजून घेतलेली दिसली. नंद्याच्या माध्यमातून उभा राहणारा संघर्ष आणि वास्तववादी ताण त्यांनी सहजतेने उलगडला. शारदा या भूमिकेत डॉ. भाग्यश्री चिमकोडकर यांनी उत्कृष्ट अभिनय केला. संगिता श्रीमंत राऊत (नलू), अक्षय कानोले (सुधाकर), अंजली माढेकर (कावेरी), अनिल देशपांडे (आसाराम), सई निरपने (सुहासिनी–ठमी), श्रीनिवास गुडसुरकर (विठोबा), डॉ. सुधीर शिवनीकर (कळवणकर), अंबालिका शेटे (मिसेस. कळवणकर), गुलाब पावडे (शेतकरी), सुचिता भर गोर्देव (बाई), गणेश भोरे (प्रेक्षक १), प्रल्हाद घोरबांड (प्रेक्षक २) यांनी भूमिकांना आवश्यक खोली आणि सहजता दिली. डॉ. कृष्णानंद पाटील (राजा) यांनीही योग्य उपस्थिती ठेवली. दिग्दर्शनाच्या दृष्टीने, डॉ. मनीष देशपांडे यांनी मूळ नाटकाच्या आत्म्याशी पूर्ण प्रामाणिक राहून सादरीकरण आधुनिक प्रेक्षकांना भावेल अशा शैलीत मांडले. काही प्रसंगात शांततेला दिलेले महत्त्व आणि काही ठिकाणी संवादांची वेगळी लय—या निर्णयांनी नाटकाची भावनिक धार अधिक तीक्ष्ण केली. नाटकाच्या शेवटच्या प्रसंगात नाट्यगृहात काही क्षण स्तब्धता पसरली. त्या शांततेतूनच या प्रस्तुतीचे यश उमटल्याचे स्पष्ट दिसले. एकूणच, मुक्ताई प्रतिष्ठानचे हे सादरीकरण अभिनय, तांत्रिक मांडणी आणि दिग्दर्शनाच्या सुसंवादामुळे ‘नटसम्राट’च्या वेदनादायी वास्तवात प्रेक्षकांना खोलवर घेऊन जाणारे ठरले. या नाट्यप्रयोगाला मिळालेली दाद ही त्याच्या कलात्मक परिपक्वतेची साक्ष आहे.
आज सायंकाळी ७ वा.सरस्वती प्रतिष्ठान, नांदेड द्वारा निर्मित, सुहास देशपांडे लिखित व महेश घुंगरे द्वारा दिग्दर्शित ‘ ब्रह्मद्वंद्व’ हे नाटक सादर होणार आहे. ही राज्य नाट्य स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी व सांस्कृतिक कार्य संचालनालायाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!