भारतीय पोलीस सेवेतील 77 व्या सरळ सेवा प्रविष्ट (Direct IPS Batch) तुकडीतील महाराष्ट्र संवर्गासाठी नियुक्त झालेल्या 13 परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षणाकरिता नियुक्त करण्यात आले आहे. यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक ही नवीन हुद्द्याची निर्मिती करण्यात आली असून हे अधिकारी 24 नोव्हेंबर 2025 पासून महाराष्ट्रातील सेवेत रुजू होणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकादमी, हैदराबाद येथे फेज-1 चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे सर्व 13 अधिकारी 29 आठवड्यांच्या जिल्हा प्रात्यक्षिक प्रशिक्षणाकरिता महाराष्ट्रात दाखल होणार असून हा कालावधी 24 नोव्हेंबर 2025 ते 21 ऑगस्ट 2026 असा असेल. या काळात त्यांना सहाय्यक पोलीस अधीक्षक (ASP) म्हणून संबोधले जाईल.
► महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये झालेली नियुक्ती पुढीलप्रमाणे
- कोल्हापूर – अरंक्षा यादव
- अमरावती ग्रामीण – सागर संजय भामरे
- अकोला – ईशानी आनंद
- जालना – जान्हवी बाळासाहेब शेखर
- चंद्रपूर – गौरव गंगाधर कायंदे पाटील
- पालघर – कुमार सुशांत
- धाराशिव – मेघना आय. एन.
- बीड – राहुल कुमार
- सोलापूर ग्रामीण – राहुल रमेश अत्राम
- यवतमाळ – तेजस सुदीप सारडा
- नांदेड – शशांत एन. एम.
- रायगड – सुयश कुमार सिंग
- बुलढाणा – आदित्य कुमार सिंग
► नांदेडसाठी नियुक्त झालेले शशांत एन. एम. – तरुण आणि प्रतिभावान अधिकारी
नांदेड जिल्ह्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून येणारे शशांत एन. एम. हे वर्ष 2023 मध्ये केवळ 23 व्या वर्षी UPSC उत्तीर्ण झालेले तरुण अधिकारी आहेत. त्यांनी UPSC मुलाखतीत 195 गुण मिळवत कर्नाटक राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यांची ऑल इंडिया रँक 1459 आहे.
शशांत हे कृषी पदवीधर (Agriculture Graduate) असून त्यांची प्रतिभा व कर्तव्यनिष्ठा पाहता त्यांना नांदेड जिल्ह्यात प्रात्यक्षिक प्रशिक्षणाकरिता पाठवण्यात आले आहे.महाराष्ट्रात दाखल झालेल्या या 13 नवीन सहाय्यक पोलीस अधीक्षकांमुळे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या यंत्रणेला नवचैतन्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
