नांदेड (प्रतिनिधी)-भायेगाव-देगाव या गावाचे ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक यांनी मंजुर झालेल्या घरकुलाच्या ठिकाणाची स्थळ पाहणी पंचनामा करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 4 हजारांची लाच स्विकारतांना ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. त्याच्या अंगझडतीमध्ये सुध्दा 4 हजार 390 रुपये सापडले आहेत.
एका 49 वर्षीय तक्रारदाराने 17 नोव्हेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, त्यांच्या चुलत्यांचे घरकुल मंजुर झाले आहे. दि.3 सप्टेंबर 2025 रोजी त्यांना घरकुलाचा पहिला हप्ता 15 हजार रुपये प्राप्त सुध्दा झाला आहे. 15 दि वसांपुर्वी त्यांचे चुलते भायेगाव-देगावचे ग्रामसेवक वामन शेषराव बिरादार (52) यांना भेटले. त्यावेळी त्यांनी दि.13 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांच्या चुलत्यांना सांगितले की, घरकुलाचा पुढील हप्ता मिळण्यासाठी घरकुलच्या ठिकाणी पाहणी स्थळ पंचनामा करावा लागतो आणि त्यासाठी 5 हजार रुपये लाच द्यावी लागेल. या लाच मागणीची पडताळणी आज 19 नोव्हेंबर रोजी पंचायत समिती देगलूर कार्यालयाच्या आवारात झाली. त्यावेळी पंचासमक्ष वामन बिरादारने तडजोडीनंतर 4 हजार रुपये लाच मागितली आणि ती स्विकारण्यास सहमती दाखवली. जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभाग देगलूर कार्यालयात वामन बिरादारने 4 हजारांची लाच स्विकारताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अंगझडतीमध्ये 4 हजार 390 रुपये रोख रक्कम, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि मोबाईल सापडला आहे. लाच लुचपत विभागातील पोलीस निरिक्षक करीम खान सालार खान पठाण यांच्या तक्रारीवरुन देगलूर पोलीस ठाण्यात ग्रामसेवक वामन बिरादारविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिपर्यंत सुरू होती. ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात झाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक रसुल तांबोळी हे करणार आहेत.
ग्रामसेवक अडकला 4 हजारांच्या लाच जाळ्यात
