नवीन नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीणच्या शांत परिसरात शोककल्लोळ उसळवणारी घटना समोर आली आहे. उच्चशिक्षित, तेजस्वी भविष्याची स्वप्ने डोळ्यांत भरलेली 27 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्या प्रवृत्त करणे तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, १६ नोव्हेंबरच्या रात्रीच्या निवांत शांततेला भेदत युवतीच्या आत्याच्या फोनवर सहायक पोलिस निरीक्षक रेखा काळे यांचा अचानक कॉल आला. त्यांच्याकडून, “तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे” ही हृदय पिळवटून टाकणारी बातमी कळताच घरात आक्रोशाचे ढग दाटून आले.त्यानंतर मुलीचे वडील तातडीने घटनास्थळी पोहोचले. तेथे दिसलेल्या संशयास्पद परिस्थितीच्या आधारे त्यांनी तक्रार दिली आणि त्यावरूनच गुन्हा नोंदविण्यात आला.
मृत युवती ही एम.ए. पदवीला भिडणारी कुशाग्र विद्यार्थिनी, घरातील आशेचा दीप होती. तिच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, शैलेश नावाच्या व्यक्तीच्या घरात माधव सोनाजी काळे हा तरुण किरायाने राहत होता. युवती आणि माधव यांच्यात प्रेमसंबंध होते.वडिलांचा आरोप असा की, या नात्यातील काहीतरी गडबड, काहीतरी गूढ काळोख तिच्या मनावर कोसळला असावा आणि त्याच कारणाने तिने शैलेशच्या घरातच गळ्याला फास लावून, पंख्यावर लटकत जीवनयात्रा समाप्त केली.या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी माधव सोनाजी काळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून तपासाची सूत्रे पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली आहेत.
