नांदेड – सत्यशोधक समाज नांदेडच्यावतीने दि.15 नोव्हेंबर 2025 शनिवार रोजी काबरा नगर बिरसा मुंडा चौक नांदेड येथे धरती आबा, क्रांतीसुर्य, आदिवासी समाज क्रांतीचे जनक भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून सत्यशोधक समाजाचे नांदेड जिल्हाध्यक्ष मा.श्री.दत्ता तुमवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सत्यशोधक समाज नांदेडचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.दत्ता तुमवाड यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी करून आपले विचार मांडले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, बिरसा मुंडा यांनी 18 व्या शतकात जल, जंगल, जमीन ही मुळ आदिवासी जमातींची विरासत असतांना इंग्रजांनी व फितूरी सावकारांनी या आदिवासी जमातींवर अन्याय केला. याचा बदला म्हणून बिरसा मुंडा यांनी तमाम आदिवासी जमातींच्या समवयस्क युवकांना एकसंघ करून 1895 मध्ये उलगुलान हा लढा उभारून बंड पुकारला. भारत देशातील तमाम आदिवासी जमातींना जमीन कास्त करण्यासाठी परत मिळवून देऊन ब्रिटीशांना धडा शिकविला, असे महान कार्य करणारे क्रांतीकारक म्हणजेच बिरसा मुंडा हे होय, असे प्रतिपादन केले.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना पुढे ते आपल्या भाषणात म्हणाले की, या आधुनिक काळामध्ये युवकांनी ॲन्ड्राईड मोबाईलमध्ये रममान न होता बिरसा मुंडा यांचा इतिहास अंगीकारून त्यांचा आदर्श घेवून समाजाप्रती-देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे, असेही ते शेवटी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सत्यशोधक समाजाचे नांदेड जिल्हाध्यक्ष दत्ता तुमवाड, एसटी महामंडळाचे माजी डेपो मॅनेजर तुकाराम टोम्पे, कवी बि.एन.मोरे, बामसेफचे मोहन वाघमारे, मन्नेरवारलू संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष दत्तात्रय अन्नमवाड, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, आदिवासी कोळी महादेव समाजाचे माधव रेडेवाड, दादाराव कोठेवाड, चर्मकार महासंघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष गणपतराव वाघमारे, कॉ.बि.एन.घायाळे, बालाजी पाटोळे, गंगाधर अनपलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मोहन वाघमारे यांनी मानले. याप्रसंगी जयंती कार्यक्रमास सर्व समाज बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
