
नवीन नांदेड (प्रतिनिधी)- बळीरामपूर येथे काल रात्री सूडाच्या अंगारातून भयाण हत्याकांड उफाळले. राष्ट्रपाल तुकाराम कपाळे यांच्या निर्घृण खुनाने संपूर्ण परिसर दहलून गेला. आरोपी पळून गेलेले, प्रत्यक्षदर्शी नसलेले, नावे कुणी सांगितलेली नसतानाही,नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या तीन तासांत तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींना जेरबंद केले.
कपाळे यांचा सुरीने वार करून खून
प्राप्त माहितीनुसार राष्ट्रपाल तुकाराम कपाळे हे ऑटोचालक असून काल रात्री त्यांच्या घराजवळच त्यांच्यावर धारदार हत्याराने सपासप वार करत खून करण्यात आला. हल्ल्याच्या वेळी आसपास कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे आरोपींची नावे किंवा ओळख सुरुवातीला उपलब्ध नव्हती.
तरीही पोलिसांची तुफानी तपास मोहीम – तीन आरोपी जाळ्यात
पोलिसांनी तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि पुराव्यांच्या धाग्यांवर आधारित वेगवान शोधमोहीम राबवून तीन युवकांना अटक केली.
अटक आरोपी पुढीलप्रमाणे..
- नागेश राजेंद्र गवळे, वय (20) राहणार वाघाळा
- अभिजीत राजू गजभारे, वय (21), राहणार धनेगाव
- लकी राजकुमार पारखे, वय (19), राहणार गाडीपुरा
हल्ल्यात वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे.
खुनामागची पार्श्वभूमी – १५ वर्षांचा सूड!
या प्रकरणातील धक्कादायक बाजू म्हणजे हत्येचा हेतू.
सन 2009 मध्ये नागेश गवळे यांच्या वडिलांचा खून झाला होता. त्या प्रकरणात राष्ट्रपाल तुकाराम कपाळे हे आरोपी म्हणून नामोल्लेखित होते, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.वडिलांच्या हत्येची सल मनात साठवून नागेश गवळे यांनी दोन मित्रांच्या मदतीने “खूनाचा बदला खूनानेच” असा मार्ग स्वीकारल्याचे तपासात उघड झाले आहे, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.
पोलिसांच्या ताब्यात आरोपी – पुढील तपास सुरू
सध्या हे तिन्ही आरोपी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास पोलीस उप अधीक्षक प्रशांत शिंदे,पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात जलदगतीने सुरू आहे.
