कुंडलवाडी येथील जकात नाक्यावर 21 लाख 50 हजारांचे रोकड सापडले

कुंडलवाडी (प्रतिनिधी)-कुंडलवाडी येथील जकात नाका येथे नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एसएसटी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. यातच दि.12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता एका कारमध्ये 21 लाख 50 रुपयांची रक्कम एसएसटी पथकाने पकडली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भेट दिली.
नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून आचारसंहिता काळात कुंडलवाडी शहरात येणारे प्रत्येक वाहनांची तपासणी करण्याकरीता जकात नाका येथे एसएसटी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. दि.12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता एसएसटी पथकाने बिलोलीकडून कुंडलवाडी शहराकडे येणारे कार क्र.एमएच 26 एके 7248 यास थांबवून चौकशी केली असता कारमध्ये 21 लाख 50 हजार रुपयांची रक्कम एका लोखंडी पेटीमध्ये आढळून आली. सदरील रक्कम एसएसटी पथकाने ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान भेट दिली असून सदरील रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली असून, या रकमेबाबत चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत ही रक्कम ट्रेझरी कार्यालयात जमा करण्यात येणार असून चौकशीनंतर पुढील कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी दिली.
नायब तहसीलदार अनिल परळीकर, मुख्याधिकारी दीपक मोरे, धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय अधिकारी दशरथ पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर यांनी घटनास्थळी भेट दिली. हि कारवाई एसएसटी पथकातील विशाल चंदापुरे, अभिजीत धुप्पे, निशिकांत अप्पाने, पोलीस कर्मचारी मिर्झा फैय्याज बेग यांनी केली. सदरची रक्कम कुणाची, वाहन कुणाचे व कुठल्या पक्षाकडून हि रक्कम आली याचा तपास होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!