नांदेड- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नांदेड महानगराध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रमेश देवडे यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी देविदास डांगे, सचिवपदी संतोष कुलकर्णी, उपाध्यक्षपदी संदेश देवके, संघटक दत्तात्रय शेंबाळे, कोषाध्यक्ष विष्णू वाघमारे तसेच सदस्य सुनील बेंद्रीकर यांची निवड करण्यात आली आहे.
या नूतन कार्यकारिणीच्या निवडीची पत्रे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष रुपेश पाडमुख आणि जिल्हाध्यक्ष श्रीधर नागापूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ही नोंदणीकृत व कार्यक्षम संघटना असून तिची स्थापना संजय भोकरे यांनी केली आहे. राज्य स्तरावर संघटनेचे नेतृत्व मनीष केत हे अध्यक्ष आणि सौ. सुजाता खानोरे राज्य सरचिटणीस या दोघांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड महानगरातील नवी कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. रमेश देवडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आणि पत्रकारितेतील मूल्यांची जपणूक करण्यासाठी संघ सतत प्रयत्नशील राहील.” त्यांनी पुढे सांगितले की, आगामी काळात नवीन सभासद नोंदणी, कार्यकारिणीचा विस्तार आणि पत्रकार हिताच्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल. या प्रसंगी रुपेश पाडमुख, श्रीधर नागापूरकर आणि रमेश पांडे यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीमुळे नांदेडमधील पत्रकारांच्या संघटित आणि सकारात्मक नेतृत्वाला नवी दिशा मिळणार आहे.
