*जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*

नांदेड :– “वंदे मातरम” या राष्ट्रभावना जागविणाऱ्या गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त आज जिल्ह्यात वंदे मातरम समूह गायन कार्यक्रम सर्वत्र उत्साहात संपन्न झाला. नांदेड येथे श्री गुरूग्रंथ साहिबजी भवन येथे हा कार्यक्रम हजारो विद्यार्थ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रभक्तीच्या वातावरणात उत्साहात पार पडला.
श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, तहसिलदार संजय वारकड, गुरुद्वारा अधीक्षक हरजितसिंग कडेवाले, शहर पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजने, जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक यांच्यासह शहरातील विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक स्थळी सकाळी 10 वा. एकाच वेळी “वंदे मातरम्” गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि अभिमानाची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभागाच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दिल्ली येथील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सामूहिक वंदे मातरम गीत गायन सुरु होते, हा कार्यक्रम सर्वाना दूरदृश्यप्रणालीद्वारे दाखविण्यात आला.
“वंदे मातरम्” गीताच्या 150 व्या वर्षानिमित्ताने घेतलेल्या या सामूहिक गायन उपक्रमाने जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह आणि ऐक्याची भावना वृद्धिंगत झाली. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ‘वंदे मातरम’ या गीताचा विशेष उल्लेखनीय प्रभाव राहिला आहे आणि हे गीत स्वातंत्र्य सैनिकांसाठी प्रेरणास्त्रोत बनले होते. थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली रचलेल्या ‘वंदे मातरम’ या गीताला शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या दरम्यान एकूण चार टप्प्यात राज्यात विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून कौशल्य विकास विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यभरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी “वंदे मातरम्” गीतावर आधारीत लघुनाटिका सादर केली.
