नवीन नांदेड (प्रतिनिधी) नांदेडच्या शांततेला पुन्हा रक्तरंजित कलाटणी मिळाली आहे.आठ दिवसांपूर्वी शहराच्या पूर्वेकडील पवडेवाडी परिसरात झालेल्या खुनानंतर, आता दक्षिणेकडील सिडको भागातही तशीच भीषण घटना घडली आहे. बालाजी मंदिर परिसरात राहणाऱ्या दोन तरुणांमधील वादाचे रूपांतर अखेर खुनात झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम हेंद्रे (वय 22) आणि साई वट्टमवार (वय 25) हे दोघे सिडको येथील बालाजी मंदिर परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यात तीव्र वाद झाला होता. काल रात्री पुन्हा एकदा दोघांमध्ये तणाव वाढला आणि संतापाच्या भरात साई वट्टमवारने शुभम हेंद्रेवर हल्ला चढवला. लाथाबुक्क्यांच्या मारहाणीत शुभम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याच आठवड्याच्या सुरुवातीला पावडेवाडी परिसरातही असाच खून झाला होता. तेथे रितेश पावडे (वय 21) याचा दिगंबर उर्फ दीपू पावडे याने धारदार शस्त्राने निर्घृण खून केला होता. दोघांमध्ये देखील दीर्घकाळापासून वाद सुरु होता. पोलिसांकडे अनेक तक्रारी दाखल असून अखेर या रागाच्या ज्वाळांमध्ये रितेशचा जीव गेला. घटनेनंतर भीतीने दीपक पावडेने विषप्राशन केल्याची माहिती मिळाली असून, मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेने दिगंबरपावलेला पाथरी गावातून ताब्यात घेतले होते. तेव्हा त्याने विष प्राशन केले होते असे सांगतात म्हणून त्याला अगोदर माजलगाव रुग्णालयात उपचार देण्यात आला आणि सध्या तू परभणी येथील रुग्णालयात उपचार घेत आहे
एका आठवड्यात दोन तरुणांचे अशा प्रकारे झालेले खून नांदेडच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. शहरात वाढणाऱ्या तरुणांच्या हिंसक प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या दोन्ही घटनांची सखोल चौकशी करत आहेत.
