हरियाणाची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर संपूर्ण देशभर अशी प्रतिक्रिया होती की तेथे काँग्रेसचे सरकार येणार आहे. परंतु निकाल उलट लागले आणि अपेक्षेपेक्षा अधिक बहुमताने भारतीय जनता पक्ष विजयी झाला. या घटनेचा शोध खासदार राहुल गांधी यांनी घेतला आणि त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जणू “हायड्रोजन बॉम्ब”च फोडला.राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांच्यावर देशाशी गद्दारी केल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार हरियाणामध्ये सुमारे दोन कोटी मतदारांपैकी तब्बल २५ लाख मतांची चोरी झाली आहे. म्हणजेच दर आठ मतदारांमागे एक मतदार “चोरलेला” आहे. त्यांनी हजारो पानांचे दस्तावेज सादर करून पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राहुल गांधींच्या मते, अशा गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यायला हवा होता, तसेच हरियाणाची निवडणूक रद्द करून नव्याने निवडणूक घ्यायला हवी. त्यांच्या मते, हरियाणातील सध्याचे सरकार हे “मतांची चोरी” करून उभारलेले सरकार आहे.पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी एक ब्राझिलियन मॉडेलचा फोटो दाखवला आणि सांगितले की त्या महिलेचा फोटो हरियाणातील अनेक मतदार यादीत वेगवेगळ्या नावाने वापरण्यात आला आहे. कुठे ती संगीता, कुठे स्वीटी, कुठे रागिनी तर कुठे लक्षणा म्हणून दाखवली गेली आहे. हा निवडणूक आयोगाच्या बेईमानीचा पुरावा असल्याचे त्यांनी म्हटले. काही मतदान केंद्रांवर एकाच व्यक्तीच्या फोटोवरून २२ वेळा मतदान झाले असल्याचा दावा त्यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोग निष्पक्ष असल्याचा दावा करतो, पण प्रत्यक्षात त्यांनी देशातील निवडणूक प्रक्रियेची खिल्ली उडवली आहे. जर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते असाल तर देशात कुठेही जाऊन कितीही वेळा मतदान करू शकता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या मते, भाजप लाखो बोगस मतदार तयार करत आहे आणि निवडणूक आयोग त्यात सहभागी आहे.त्यांनी दाखवलेल्या काही मुलाखतींमध्ये मतदारांनी सांगितले की त्यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत मतदान केले, पण २०२५ मधील हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्यांची नावे यादीतून गायब झाली. काही गावांतील शेकडो मतदारांची नावे वगळली गेली असून, नवीन अर्ज देऊनही त्यांना मतदार यादीत समाविष्ट केले गेले नाही.
राहुल गांधींच्या मते, काँग्रेस हरियाणाची निवडणूक जिंकली होती, परंतु निवडणूक आयोगाने मतांची चोरी करून भाजपला विजयी केले. केवळ २२ हजार मतांच्या फरकाने काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर २५ लाख मतांची चोरी केल्याचा थेट आरोप केला.त्यांनी पुढे सांगितले की, एका घरात शेकडो मतदार दाखवले गेले, काही घरांचे क्रमांक “००” दाखवले गेले, आणि काही मतदार यादीत तर घरच नाही अशा लोकांची नावेही होती. एका विधानसभा मतदारसंघात एकाच फोटोवरून शंभर वेळा मतदान झाले, तर सुमारे १ लाख २४ हजार मतदार बोगस असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, ही समस्या एका मिनिटात सुटू शकली असती, परंतु निवडणूक आयोगाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले कारण ते भारतीय जनता पक्षाच्या मदतीसाठी कार्यरत आहेत. त्यांनी असा आरोप केला की भाजपचे काही मतदार हरियाणा आणि उत्तर प्रदेश दोन्ही ठिकाणी मतदान करत आहेत.त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हरियाणातील सध्याचे सरकार वैध नाही, ते “मतदान चोरीच्या दमावर बनलेले” आहे. असेच प्रकार महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्येही घडवले गेल्याचे त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले की भारतीय लोकशाही, संविधान आणि पारदर्शकतेच्या रक्षणासाठी युवकांनी आणि नागरिकांनी पुढे यायला हवे. भारताची निवडणूक प्रक्रिया जगभरात पारदर्शक मानली जाते, पण आजच्या उघडकीमुळे हे स्पष्ट झाले आहे की निवडणुका “फिक्स” करून घेतल्या जात आहेत.त्यांनी म्हटले की आज भारतात मतदान मोजले जात नाही, तर मतदान “तयार” केले जाते. त्यांनी युवकांना लोकशाही रक्षणासाठी उभे राहण्याचे आवाहन केले आणि विचारले. “आपण अशा देशात जगत आहोत का जिथे निवडणुकीपेक्षा सत्ता महत्त्वाची झाली आहे?”
