नागरीकांची कामे करता येत नाहीत तर सत्तेत का बसता?-सुजात आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-ज्या लोकांना नागरीकांचे प्रश्न सोडविता येत नाहीत ते सत्तेत का बसतात असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला.
काल प्रभाग क्रमांक 7 नागसेनगर येथे आयोजित संकल्प सभेत सुजात आंबेडकर बोलत होते. अजित पवार यांनी शेतकऱ्यांचे कर्ज कितीवेळेस माफ करावे असे वक्तव्य केल्यानंतर त्याचा समाचार घेतांना सुजात आंबेडकर म्हणाले देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अतित पवार हे मोठ-मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करतात आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतांना उलट प्रश्न विचारतात. मी अजित पवार यांना विचारू इच्छीतो की, शेतकऱ्यांचे हक्क आणि अधिकार सरकार कितीवेळेस खाऊन टाकणार आहे हे त्यांनी सांगावे. सरकारमध्ये सत्तेत राहु तुम्हाला जनतेची कामे करता येत नाहीत तर तुम्ही सरकारमध्ये का जाता असा प्रश्न सुजात आंबेडकर यंानी विचारला.
सध्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पुर्व तयारीसाठी आपण एकत्र आलो आहोत. असे सांगत आपल्या भाषणाची सुरूवात करतांना सुजात आंबेडकर म्हणाले की, तुमचे प्रश्न, तुच्या दैनंदिन जीवनाचे प्रश्न, तुमच्या वस्तीचे प्रश्न, तुमच्या हक्काचे प्रश्न सोडविण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे आणि त्यासाठी मला आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडूण द्यावे अशी अपेक्षा आपल्याकडून आहे. वंचित बहुजन आघाडीला हवी तेवढी भरारी अद्याप मिळाली नाही. त्याचे कारण स्पष्ट करतांना सुजात आंबेडकर म्हणाले सत्तेची ताकत आमच्या हातात आलीच नाही आणि ती मिळविण्यासाठीच मी प्रयत्नशिल आहे.
वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी तुमच्या बंधूंना मिळणार, तुमच्या घरातल्या माणसाला मिळणार, तुमच्याच गल्लीतील माणसाला मिळणार तर मग त्याला निवडूण देण्याची जबाबदारी सुध्दा घरातील माणसांचीच आहे म्हणजेच तुमच्या सर्वांची आहे.तो निवडुण आला तरच तुमचे प्रश्न सोडविले जातील. नाही तर आजपर्यंत भारताच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षानंतर सुध्दा तुमचे प्रश्न तसेच उभे आहेत.
नांदेड जिल्ह्यासाठी दलित वस्तीच्या विविध योजनांसाठी दरवर्षी 60 कोटी रुपयंाचा निधी येत असतो. एवढा निधी दलित वस्त्यांमध्ये खर्च झाला असता तर दलित वस्त्यांची परिस्थिती सुंदर झाली असतील. 60 कोटी रुपये किती असतात हे मला तर माहित नाहीत. आपल्यापैकी कोणी आपले शेजारी खा.अशोक चव्हाण यांच्या घरी गेले असतील तर त्यांना कधी तरी ते 60 कोटी रुपये पाहायला मिळाले असतील असे सांगितले. वंचित बहुजन आघाडीची सत्ता आली तरी 60 कोटी रुपयांमधील एक छदामसुध्दा मी कोणी खाणार नाही याची दक्षता घेईल. आपल्याला आपण सर्व मिळून सत्ता हातात घ्यायची आहे तरच आपण आला विकास करू शकू. म्हणून प्रत्येक त्रासाच्यावेळेस धावून येणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प मी तुमच्याकडून घेत आहे.


याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक राहुल सोनसळे म्हणाले आपले काम करत असतांना त्याला नकार मिळतो आणि तो नकार आमच्यासाठी त्रासदायक असतो. इतरांना मात्र त्याच कामाच्या सुविधा मिळतात. म्हणून आमच्यावरचा अन्याय सुरूच आहे.
याप्रसंगी बोलतांना शाम कांबळे म्हणाले की, आम्ही ज्या भागात राहतो तो भाग माणसांच्या राहण्यासाठी आहे काय? असा प्रश्न आम्हाला पडतो. ज्या त्रासाला संपविण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते. त्या त्रासाला दुर करण्यासाठी आम्हाला लढा द्यावा लागतो हे आमचे दुर्देव.
याप्रसंगी विशाल एडके म्हणाले की, 2007 पासून प्रभाग क्रमांक 7 मध्ये वंचित बहुजन आघाडी नेहमीच पुढे राहिलेली आहे. काही जणांनी प्रभाग क्रमांक 7 चा 7/12 अशोक चव्हाण यांच्या नावे करण्याचा प्रयत्न केला. परंतू आता तो 7/12 विशाल एडके आणि राहुल सोनसळे यांच्या नावावर आहे. यासभेत जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, डॉ.संघरत्न कुऱ्हे यांचीही उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!