नांदेड(प्रतिनिधी)-हैदरबाग येथील एका सर्व्हीस सेंटरचे कम्पाऊंड तोडून 78 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. सारखणी येथे एक ग्राहक सेवा केंद्राचे शेटर अर्धवट उघडून त्यातून 30 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. मौजे रहाटी ता.भोकर येथे एक आरोपी दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरतांना पकडण्यात आला आहे. तसेच मुखेड बसस्थानकात बसमध्ये प्रवेश करतांनाच्या गर्दीचा फायदा घेवून चोरट्यांनी 60 हजारांचा ऐवज चोरला आहे.
परवेज रहेवर शेख रसुल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 ऑक्टोबरच्या रात्री 9.30 ते 1 नोव्हेंबरच्या पहाटे 10.30 वाजेदरम्यान हैदरबागमधील त्यांच्या मालकीचे हायटेक एंटरप्रायझेस सर्व्हीस सेंटरचे कम्पाऊंटचे कुलूप तोडून दुरूस्तीसाठी आलेल्या 78 बॅटऱ्या 78 हजार रुपये किंमतीच्या कोणी तरी चोरुन नेल्या आहेत. इतवारा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 340/2025 दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मिर्झा अधिक तपास करीत आहेत.
दहेली तांडा ता.किनवट येथील सुरज शिवदास पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 ते 1 नोव्हेंबरच्या रात्री 1.30 वाजेदरम्यान सारखणी येथील त्यांच्या मालकीच्या सर्व्हीस सेंटरचे शटर अर्धवट उघडून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि दुकानातील रोख रक्कम 20 हजार रुपये आणि एक मोबाईल दहा हजार रुपयांचा असा 30 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. सिंदखेड पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 149/2025 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार कुमरे अधिक तपास करीत आहेत.
मौजे रहाटी (बु) ता.भोकर येथील पोलीस पाटील अशोक महादु बागडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजेच्यासुमारास मौजे रहाटी (बु) येथील महादेव मंदिराची दानपेटी फोडून त्यातील 7 हजार रुपये चोरतांना रहाटी येथील श्रीकांत लक्ष्मण कासमोड यास पकडण्यात आले आहे. मुखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 517/2025 दाखल केला असून पोलीस अंमलदार राचलवार अधिक तपास करीत आहेत.
मुखेड बसस्थानकात 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्यासुमारास माधवराव बापुराव बोडके रा.जाहुर ता.मुखेड हे आपल्या पत्नीसह उदगीरला जाणाऱ्या बसमध्ये प्रवेश करत होते. तेथे असलेल्या गर्दीचा फायदा घेवून चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या पिशवीत ठेवलेले. 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरले आहेत. मुखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 248/2025 दाखल केला असून पोलीस अंमलदार गोंटे अधिक तपास करीत आहेत.
हैदरबागमध्ये चोरी, सारखणी येथे ग्राहक सेवा केंद्र फोडले, महादेव मंदिरात चोरी, मुखेड बसस्थानकात दागिणे चोरले
