नांदेड :- राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत “अमृत दुर्गोत्सव 2025”या राज्यभर साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-दुर्गांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून तो वारसा जनतेपर्यंत पोहोचविणे हा आहे.
या अभिनव उपक्रमाअंतर्गत नागरिकांना आपल्या घराच्या अंगणात, गॅलरीत किंवा सोसायटी परिसरात रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, शिवनेरी, पन्हाळगड, लोहगड, पद्मदुर्ग, जिंजी, साल्हेर, विजयदुर्ग व खांदेरी या शिवकालीन 12 दुर्गांपैकी कोणताही एक दुर्ग साकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तयार झालेल्या दुर्गासोबत सेल्फी काढून ती www.durgotsav.com या संकेतस्थळावर अपलोड करायची आहे. प्रत्येक सहभागीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिनंदन पत्र देण्यात येणार असून, हा उपक्रम पूर्णपणे लोकसहभागातून राबविण्यात येत आहे.
ही स्पर्धा नसून आपल्या संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमान साजरा करण्याची संधी आहे. प्रत्येक घराघरात गड-दुर्ग उभे राहावेत, हाच या उपक्रमामागचा हेतू आहे. या माध्यमातून राज्यभरातील नागरिकांमध्ये शिवचरित्राबद्दल आदर, प्रेरणा आणि अभिमान वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांनी “अमृत दुर्गोत्सव 2025”या अनोख्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शौर्य, पराक्रम आणि इतिहासाचा अभिमान साजरा करावा, असे आवाहन अमृतचे संचालक विजय जोशी यांनी केले आहे.
