लॅपटॉप बॅग तक्रारदाराकडे सोपवली
नांदेड –अजिंठा एक्स्प्रेसमधून हैदराबाद ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान १८ ऑक्टोबरला पहाटे तीनच्या सुमारास आयटी कंपनीत कार्यरत एका तरुणाची बॅग लॅपटॉपसह चोरीस गेली. नांदेड रेल्वे पोलिसांनी निरीक्षक पी. व्ही. वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे याचा सात दिवसांत छडा लावत २५ ऑक्टोबरला साईनाथ माधव नादरे (२०, रा. खेरगाव ता. अर्धापूर) याला अटक केली. लॅपटॉप व बॅग जप्त करून ती तत्परतेने तक्रारदार युवकाकडे सोपवली.
वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी ए. बी. मोहिते, हवालदार गणेश जाधव, वसिम शेख, चालक राहूल दाभाडे यांच्या पथकाने मोबाईल लोकेशनच्या आधारे कौशल्याने चोरट्याचा ठावठिकाणा शोधला. दोन-तीन दिवस हा चोरटा याच मोबाईलवरून वैयक्तिक फोन कॉल करीत होता. यातच तो अडकला. हैदराबाद-संभाजीनगर मार्गावर सणासुदीच्या काळात रेल्वेतून लॅपटॉप व मोबाईल चोरीस जाण्याचे प्रमाण प्रचंड आहे.
असा काढला चोरट्याचा माग
परभणी ते जालनादरम्यान चोरलेल्या या बॅगमधील आधार कार्डच्या माध्यमातून तक्रारदार तरुणाचा मोबाईल क्रमांक चोरट्याने मिळवला. पहाटे पाचच्या सुमारास चोरलेल्या एका मोबाईलवरून त्याने तरुणास कॉल केला व पैशाची मागणी केली होती. नांदेड येथे नव्यानेच रूजू झालेले पोलिस निरीक्षक वाघमारे यांच्या पथकाने या नंबरवरील सर्व कॉलच्या आधारे तपास केला. बॅगमध्ये लॅपटॉप, आधार, पॅन, गाडीची आरसी, २ ते २.५ हजार रुपये, वॉलेट, दोन चष्मे, लॅपटॉप चार्जर, ॲपल फोनचे चार्जर असे साहित्य होते. यापैकी लॅपटॉप, दुचाकीची आणि घराची चावी सापडली.
