‘गोल्डन फसवणूक’ — जेव्हा सरकारने जनतेच्या आशेला दागिन्यांच्या दुकानात गहाण ठेवलं!

भारताच्या बाजारात पुन्हा एकदा ‘सोन्याचा ताप’ चढला आहे. दर उंचावले, आकडे फुटले, आणि चमकणाऱ्या धातूने पुन्हा एकदा देशाच्या भावनांना बांधून टाकले. सोन्याने एक लाख चाळीस हजार प्रति तोळ्याची उंची गाठली, आणि गोडी मीडियाने सांगितले, “ही सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी!”जनता धावत गेली . कोण लग्नासाठी, कोण गुंतवणुकीसाठी, कोण भविष्याच्या सुरक्षिततेसाठी. पण या चमकदार धातूमागे होता एक गडद खेळ राजकारण, कॉर्पोरेट आणि बाजाराच्या तिघांचा संगनमत.वित्तमंत्री म्हणाल्या, “अर्थव्यवस्था मजबूत आहे, लोकांचा विश्वास टिकून आहे.” पण हा विश्वास होता की भीती?

 

महागाईने जनतेचा श्वास घोटत असताना, भाजीपासून पेट्रोलपर्यंत प्रत्येक वस्तूची किंमत आकाशाला भिडत असताना, सोनंच का इतकं ‘सुरक्षित’ वाटायला लागलं?सोपं आहे,कारण सरकार आणि मीडियाने ‘सुरक्षिततेचा सोन्याचा मुखवटा’ जनतेच्या चेहऱ्यावर चढवला होता.

 

मोठे उद्योगपती आधीच खेळ करून गेले होते जनतेने खरेदी सुरू केली, आणि त्यांनी विक्रीला गती दिली. जनतेच्या भावना जळत होत्या, आणि त्यांच्या तिजोर्‍या भरत होत्या.जेव्हा सोन्याचे दर घसरले, तेव्हा सरकार शांत “ही बाजारातील सामान्य घडामोड आहे,” एवढं सांगून हात झटकले.

 

पण प्रश्न राहतो ,या “सामान्य” बाजारात नेहमीच नुकसान सर्वसामान्यांचंच का होतं?जनतेने एफडी तोडल्या, ट्युशन फी थांबवल्या, आणि लग्नाच्या हंगामात सोनं खरेदी केलं पण जेव्हा दर पडले, तेव्हा सरकारने जबाबदारी नाकारली.सोने वाढलं तेव्हा म्हणाले “भारत मजबूत”;सोने पडलं तेव्हा म्हणाले “हा बाजाराचा स्वभाव आहे”.वा रे सरकार! अलंकारिक शब्दांत सांगायचं तर —“जनतेच्या घामाने ओलसर झालेल्या नोटांवर सत्तेने चमकदार सोन्याचा मुलामा दिला.”सोनं फक्त धातू नव्हतं, ते एक मानसशास्त्रीय शस्त्र बनलं.जनतेच्या भीतीला “गुंतवणूक” नाव देण्यात आलं, आणि त्या भीतीवर नफा कमावला गेला.

 

ज्यांनी गोल्ड बॉण्ड विकले, त्यांना आधीच माहिती होती फुगा कधी फुटणार.

ज्यांनी मीडियावर सोन्याची जाहिरात केली, त्यांना माहिती होतं जनतेच्या मनात सोनं म्हणजे “सुरक्षितता”.पण हे सोनं आता सुरक्षिततेचं नाही विश्वासघाताचं प्रतीक बनलं आहे.आजही न्यूज चॅनेल्सवर “सोने स्वस्त झाले, खरेदीसाठी योग्य वेळ!” असा गोड स्वर झंकारतोय.पण जनता आता समजू लागली आहे —“आम्ही महाग घेतल्यावरच सोने स्वस्त होतं!”हा बाजार नाही, ही व्यवस्था आहे.आणि या व्यवस्थेत जनतेच्या विश्वासाचा नफा, सत्तेच्या तिजोरीत जमा होतो.सोन्याचा दर नाही पडला,सत्याचा दर पडलाय.जेव्हा सत्य पडतं, तेव्हा कोणतीही सत्ता त्याला उचलू शकत नाही.

 

विश्लेषण:

भारताची अर्थव्यवस्था आकड्यांच्या नव्हे, भावनांच्या धाग्यांनी विणली गेली आहे.

जनता अजूनही विश्वास ठेवते, आणि सत्ता त्या विश्वासावर फुगे फुगवत राहते.

एक दिवस तो फुगा फुटतो आणि चमकदार राख उरते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!