8703 तक्रारींपैकी निकाल फक्त 6; बाकी वेळ बीएमडब्ल्यू निवडण्यात अडकले लोकपाल
भ्रष्टाचारावर लक्ष ठेवणाऱ्यांनाच 70 लाखांच्या बीएमडब्ल्यू हव्या! — लोकपाल की “जोकपाल”?

2013 साली समाजसेवक अण्णा हजारे यांनी देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी केलेल्या आंदोलनातून लोकपाल विधेयक पारित झाले. त्या वेळी भारतीय जनतेला वाटले होते की, या कायद्यानंतर भारतातून भ्रष्टाचाराचे उच्चाटन होईल. परंतु आजच्या घडीत परिस्थिती उलटी दिसत आहे.
अण्णा हजारे यांनी जनतेला भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न दाखवले, त्याला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला. त्या आंदोलनातून अरविंद केजरीवाल पुढे आले आणि दिल्लीचे मुख्यमंत्री झाले, तर किरण बेदी राज्यपाल बनल्या. मात्र, आंदोलनानंतर अण्णा हजारे शांत बसले आणि आजपर्यंत त्यांनी लोकपालांच्या कामकाजावर काहीही भाष्य केलेले नाही.आता पुन्हा लोकपाल संस्था चर्चेत आली आहे, कारण लोकपाल समितीच्या सात सदस्यांनी प्रत्येकी 70 लाख रुपये किमतीच्या बीएमडब्ल्यू गाड्यांची मागणी केली आहे.

या समितीचे प्रमुख आहेत न्यायमूर्ती अजय खानविलकर, जे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. त्यांच्यासोबत इतर सहा सदस्य मिळून एकूण सात जणांची समिती आहे. या गाड्यांसाठी जवळपास पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, तो लोकपालांच्या 44 कोटींच्या वार्षिक अर्थसंकल्पातील जवळपास 10 टक्के आहे.लोकपालांचे मुख्य काम म्हणजे देशातील भ्रष्टाचारावर देखरेख ठेवणे, परंतु त्यांच्या या निर्णयामुळे उलट लोकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 2019 पासून आजपर्यंत लोकपालांकडे 8703 तक्रारी आल्या असून, त्यापैकी फक्त 24 प्रकरणांची चौकशी झाली आणि फक्त 6 प्रकरणांचे निकाल दिले गेले आहेत.
काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी या निर्णयावर टीका करत म्हटले की, “कमीत कमी एका तरी लोकपालाने तरी या गाड्यांची गरज नाही असे सांगायला हवे होते.” खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनीही लोकपाल पदाचे महत्व आणि जबाबदारी लक्षात घेऊन संयम दाखवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान, समाजमाध्यमांवर या विषयावर जोरदार चर्चा सुरु आहे. काही जण म्हणतात, “जे भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमले आहेत, तेच लक्झरी गाड्यांच्या मागे लागले तर मग जनतेचा विश्वास कुठे राहणार?”पत्रकार प्रशांत कदम यांनी आपल्या ‘वाईट अँगल’ कार्यक्रमातून यावर भाष्य करताना सांगितले.
“ही फक्त बातमी नाही, हा विनोद आहे. जे लोक भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी लढले, ते आज मौनात आहेत. अण्णांच्या त्या मौनाला दोन मिनिटे शांत राहून श्रद्धांजली वाहायला हवी.”
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मेक इन इंडिया’चा नारा देतात, आणि दुसरीकडे लोकपाल विदेशी जर्मन बीएमडब्ल्यू गाड्या मागतात, हे विरोधाभासी असल्याची टीकाही होत आहे.भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थेचाच असा ऐश्वर्यशाली खर्च हे पाहून जनतेत निराशा पसरली आहे. अनेकजण विचारत आहेत,“हा लोकपाल आहे का शोकपाल किंवा ‘जोकपाल’?”
