नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील सचखंड श्री हजुर साहिब येथून दिवाळीनंतरचा हल्ला महल्ला निघाला आणि सायंकाळी 6 वाजता महाविरचौकातून प्रतिकात्मक हल्ला करण्यात आला. पुढे ही मिरवणूक बाफना टी पाईंट येथून परत येवून गुरुद्वारा येथे पोहचती.
आज दुपारी 4 वाजता सचखंड हजुर साहिब येथील मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी आणि पंचप्यारे साहिबान यांनी अरदास (प्रार्थना) करून हल्ला महल्ला मिरवणूकीला सुरूवात केली. मिरवणूकीसोबत संत बाबा कुलवंतसिंघजी सुध्दा पायी चालत महाविर चौकापर्यंत आले. जागो जागी नागरीकांनी निषाण साहिब यांची आरती करून प्रसाद वाटला. बॅन्ड पथक, भजनी मंडळी, गदगा(शस्त्र विद्या) करत ही मिरवणूक हळूहळू महाविर चौकापर्यंत पोहचली. महाविर चौकात प्रार्थना करून प्रतिकात्मक हल्ला झाला तेंव्हा बोले सो निहाल सत श्री अकालच्या जयघोषात प्रतिकात्मक हल्ला करण्यात आला.

पुढे ही मिरवणूक गुरुद्वारा बावलीसाहिब येथे थांबते आणि त्यानंतर हिंगोली गेट, बाफना टी पॉईंट, जुना मोंढा अशी वळसा घेवून रात्री 9 वाजेपर्यंत पुन्हा सचखंड श्री हजुर साहिब येथे पोहचते आणि या मिरवणूकीचा समारोप होतो.

