मुक्कामाबाद ( प्रतिनिधी)-बारा भाई तांडा, तालुका मुखेड (जि. नांदेड) येथे घडलेल्या एक धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विवाहितेवर सतत होत असलेल्या मौखिक, मानसिक आणि कौटुंबिक छळाच्या सावटाखाली अखेर तिने स्वतःचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुक्कामाबाद पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिवाजी तांडा, जळकोट (जि. लातूर) येथील कौशल्याबाई लक्ष्मण राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 15 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री बारा बाई तांडा, खतगाव येथे प्रियंका बजरंग चव्हाण (विवाहिता) हिने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
तक्रारीनुसार, प्रियंकावर सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक छळ, ताण-तणाव आणि अमानुष वागणूक होत होती. या त्रासाला कंटाळून प्रियंकाने टोकाचे पाऊल उचलल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी गुन्हा क्रमांक 176/2025 दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या स्वाधीन देण्यात आला आहे. या प्रकरणी बजरंग सुभाष चव्हाण, शांताबाई सुभाष चव्हाण, सुभाष वाळू चव्हाण आणि सोनू सुभाष चव्हाण या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर परिसरात शोककळा आणि संतापाची लाट पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
