न्यायाधीश, आयपीएस ,आयएएस…., अश्या सर्व अधिकाऱ्यांना हे गाणं म्हणता येईल का?
आदरणीय सीजीआय गवई यांना डरपोक म्हटल्याने अनेक लोकांनी मला फोन करून नाराजी व्यक्त केली. “तुम्ही त्या जागी असता तर काय केले असते?” अशी विचारणा केली. आदरणीय गवई म्हटले त्या प्रमाणे मलाही धक्का बसला असता. पण थोडाच काळ. तरीही ती घटना विस्मृतीत गेली नसती. कोणताही अधिकार अगर स्वातंत्र्य एकटे येत नाही. त्याच्याबरोबर जबाबदारी responsibility ही असते.
1982 सालातील घटना असावी. पनवेलला डिवाईएसपी म्हणून माझी नोकरीतील पहिलीच नेमणूक होती. न्हावा शेवा बंदरासाठी जमीन संपादन करायची होती. शासनाने पाच हजार रुपये एकर असा भाव जाहीर केला तर आदरणीय दि बा पाटील शेतकरी कामगार पक्ष यांनी तीस हजार एकरी अशी मागणी केली. सरकारने नकार दिल्यावर जासई फाटा येथे मोठे रास्ता रोको करण्यात आले. एस आर पी सह मोठा फौज फाटा होता. दगड फेक झाली. अश्रुधराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या गोळीबार झाला. आत्ता ती बहादुरी वाटत नाही पण सगळा जमाव पांगवला.
कार मधून आलेल्या पैकी एक जनाने आरडाओरडा करत पोलीस कारवाईचा निषेध सुरू केला. मी त्यांना ओळखल्याने शांतपणे घडलेली घटना त्यांना सांगू लागलो. ते आणखीच भडकले. “तू कोण रे? तुला हा अधिकार कुणी दिला? मी हायकोर्टातला एक नंबरचा वकील आहे. तुला अजून मीसरूट ( मिशा) फुटले नाहीत. आणि मला कायदा शिकवतोस?….. असं बरंच काही! माझ्या सोबत अनेक ज्युनिअर अधिकारी होते. मी शेतावर वाढलेला पोरगा. दोन पाऊल मागे सरलो. “तू तुझ्या….” लहानपनी तोंडपाठ असलेली शिवी हासडली.हातातील लाठीचा जोरदार फटका पिंडरीवर हाणला.तसा तो इसम गडबडला. मागे पळू लागला.दुसरा लगावला. त्याने व 2,3साथीदारांनी धूम ठोकली! कोण होता तो इसम? ते होते डी एन पाटील. शे का प चे तत्कालीन आमदार व महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्षनेते. त्यांचे दुसरे भाऊ प्रभाकर पाटील हे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. मोठा दबदबा होता त्यांचा. एक आवाज दिला तर हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरत. शे का पक्षाचं एक शिष्ट मंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. त्यांनी सगळी हकीगत सांगितली. अधिकारी म्हटले आता खोपडे साहेबाचे काही खरे नाही. पण काहीच घडले नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. नंतर कळालं की त्यावेळी बॅरिस्टर अंतुले हे मुख्यमंत्री होते. याच डी एन पाटील व पी एन पाटील यांनी अंतुलेंची गाडी अलिबाग येथे अडविली होती. बोनेट वर कार्यकर्ते नाचले होते. शंकरराव चव्हाण यांची ही तीच अवस्था केली होती. पुढे माझ्याविरुद्ध अनेक तक्रारी होऊनही पुढील दोन वर्षे मी तिथेच राहिलो. स्थानिक राजकारणाचा असाही फायदा!
प्रत्येक वेळी असेच होते का? सातारा एसपी असताना शरद लेवे मर्डर मध्ये तत्कालीन मंत्री व शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे यांचे नाव आरोपी म्हणून पुढे आले. त्यांचे चुलते अभयसिंहराजे यांनी धमकी दिली की उदयनराजे यांना अटक नाही केली तर आम्ही सातारा शहर पेटवून देऊ. त्याचवेळी उदयनराजेंच्या आईंनी निरोप पाठविला की अटक केली तर आम्ही सातारा पेटवून देऊ. प्रथमदर्शनी पुरावा असल्याने मी उदयनराजे यांना अटक केली. तेव्हा गृहमंत्री गोपीनाथजी मुंडे यांनी फोन करून उदयनराजे याना अटक का केली अशी विचारणा करून उलट सुलट बोलून मी ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी ” खोपडे तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात” असा आरोप केला. बेड्या घातलेल्या अवस्थेत उदयनराजेंना जमावा पुढे उभे केले नाही म्हणून अभयसिंह राजे यांनी मला त्याच ठिकाणी “एस पी खोपडे हे शिवसेना बीजेपी चा माणूस आहे आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ”असा इशारा दिला.
निवडणुकीच्या दिवशी पूर्णपणे शांतता राहिली तरी पण काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आल्यावर निवडणुकीनंतर तीन महिन्यात माझी बदली झाली. इथं अगदी कायदेशीर आणि व्यावसायिक दृष्टीने कारवाई केली होती तरीही बक्षीस मिळण्याऐवजी शिक्षा वाट्याला आली. तरीपण पाठीचा कणा ताठ राखत , जबाबदारी व उत्तरदायित्व पाळल्याचा एक चिरकाल टिकणारा आनंद मिळाला हे मात्र खरे.
* सरकारी कर्मचारी विशेषतः पोलिस यांना मातीत हात घालून श्रम करण्याचा अनुभव मिळाला तर त्यांना शेतकरी, श्रमजीवी कामगार यांचे प्रश्न समजतील म्हणून अकोला येथे श्रेष्ठता प्रकल्प राबवायला सुरुवात केली. पण आजचे मुंबई पोलीस कमिशनर देवेन भारती यांनी भुजबळांना खुश करून माझी सहा महिन्याच्या आत अकोल्यावरून बदली केली. प्रकल्पाचा हिशोब अपुरा राहिला. पीडब्ल्यूडी तर्फे प्रकल्पाचे आर्थिक ऑडिट करण्यात आले. अँटी करप्शन प्रमुख राहुल गोपाल यांनी जाहीर केले की भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली सुरेश खोपडे यांना येत्या पंधरा दिवसात जेलमध्ये टाकतो! पण काय झाले? तेच राहुल गोपाल हे एक लाख रुपयाची लाच घेताना पकडले गेले. जेलमध्ये राहिले. मी मात्र छाती पुढे करून मान उंचावून वयाच्या साठ वर्षापर्यंत पोलिस दलात काम केले व सन्मानाने निवृत्त झालो. नुसते अधिकार हे वरिष्ठ सरकारी नोकरांना तात्कालीक प्रतिष्ठा, ऐहिक,आर्थिक लाभ मिळवून देतात. कणा ताठ ठेवत, छाती पुढे काढून मान उंचावून जगण्याचा आनंद देत नाही नाहीत. जबाबदारी व उत्तरदायित्व सरकारी नोकराचे मन शुद्ध करतात.
मग प्रत्येक जन पुढील ओळी गुणगुणू शकतो .
’मन शुद्ध तुझं गोस्त आहे पृथ्वी मोलाची!
तू चाल पुढ तुला रे गड्या भीती कशाची?’
आदिवासींना लुटणाऱ्या व खून करणाऱ्या राम शाम दरोडे खुराना पकडण्यासाठी गेलो असता आमच्यावरच गोळीबार झाला त्या तीन गोळ्या मला लागल्या होत्या. सी जे आय यांच्या जागी तुम्ही असता तर काय केले असते असे प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी ही पोस्ट लिहिली. बंदुकीच्या गोळ्या येतील याची माहिती असताना मी माझी जबाबदारी पार पाडली. त्यामुळे फेकलेल्या बुटाची फिकीर ती किती करायची? निव्वळ न्यायव्यवस्था नव्हे तर लोकशाहीतील लोकप्रतिनिधी, प्रशासक, मीडिया यांनी आपली जबाबदारी आणि उत्तरदायित्व पार पाडले पाहिजे असा मेकॅनिझम निर्माण करण्यामध्ये आजची राज्यघटना अपुरी पडते असे वाटते.
त्यासाठी तिसरी क्रांती आणायला पाहिजे. व ती कशी आणायची याची मी मांडणी केलेली आहे. ती चुकीची किंवा बाळबोध ही असेल म्हणून काय झालं?
मन शुद्ध असेल तर भीती कुणाची?
–सुरेश खोपडे
